*जिल्ह्यात राणे, केसरकर राज संपविण्याचे षडयंत्र..?*
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अनेक ठिकाणी स्वबळावर लढत असल्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यात सत्तेवर असणारी महायुती मुंबई महापालिकेत युती करून लढण्याचे संकेत देत परंतु इतरत्र आवश्यकतेनुसार निर्णय घेताना दिसते आहे. सिंधुदुर्ग जिल्हा देखील याला अपवाद नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील “कार्यकर्ते आणि नेत्यांच्या मताला माझं मम” म्हणत सिंधुदुर्गात स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे राज्यात महायुती म्हणून सत्तेत असूनही स्वतःच्या जिल्ह्यात मात्र स्वबळावर निवडणुकीस सामोरे जाण्याचे नक्की गमक काय..? सिंधुदुर्गात राणे कुटुंबीय आणि आमदार दिपक केसरकर यांचा असलेला प्रभाव कमी करण्याचा तर प्रयत्न नाही ना..? असे प्रश्न निर्माण झाले आहेत..आणि याला कारणही तसेच आहे.
“सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती नको परंतु रत्नागिरी जिल्ह्यात मात्र युती हवी…?” असे का..?
बरं, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीसाठी ५०/५० टक्के जागा आणि दोन नगरपालिकांमध्ये शिवसेनेचा तर दोन मध्ये भाजपाचा नगराध्यक्ष असा फॉर्म्युला शिंदे शिवसेनेकडून देण्याचा प्रस्ताव होता. परंतु जिल्ह्यात असलेली शिवसेनेची ताकद कवडीमोल ठरवून २० पैकी अवघ्या चार जागा शिवसेनेला देण्याचे प्रस्ताव भाजपाकडून पुढे आले ज्याचा अर्थ भाजपाला महायुती नकोच होती म्हणून असे प्रस्ताव सावंतवाडी, मालवण सारख्या नगरपालिकांमध्ये पुढे करण्यात आले. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती आपोआप तुटली आणि स्वबळावर लढण्यासाठी नेत्यांसहित कार्यकर्ते तयार झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दशके नारायण राणेंचा शब्द अखेरचा असायचा. मग राणे शिवसेनेत असो किंवा काँग्रेसमध्ये त्यांचा शब्द म्हणजे काळया दगडावरची पांढरी रेघ होती. बदलत्या काळात राणे केसरकर आमनेसामने आले, जय विजय सुद्धा राणेंनी पाहिले. पण, महायुती झाली तेव्हा केसरकर राणे यांच्यातील वाद संपुष्टात येऊन दोघांमध्ये पुन्हा पूर्वीसारखे मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. राणेंच्या खासदारकीच्या निवडणुकीत केसरकर उन्हातान्हात फिरले तर केसरकरांसाठी राणेंनी खिंड लढवली होती. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती व्हावी अशी इच्छा आमदार केसरकर, आमदार निलेश राणे आणि खास.नारायण राणेंची असताना देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्याने जिल्ह्यात स्वबळावर लढण्याचे घोषित केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना युती नको होती तर रत्नागिरी जिल्ह्यात अगदीच नगण्य जागा घेऊन भाजपाने शिवसेनेशी युती कशी केली…? असा प्रश्न उभा राहत आहे…आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता सिंधुदुर्गात राणे समर्थकांची पर्यायाने राणेंची असलेली राजकीय ताकद मोडून काढण्याचा तर प्रयत्न प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करत नाहीत ना..? भाजपा पक्षाचे कार्यकर्ते असूनही “राणे समर्थक” हे नाव कुठेतरी संघाच्या मुशीत तयार झालेल्या भाजपावल्यांना बोचत आहे का..? अशा शंका येण्यास वाव आहे.
त्याचबरोबर काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम.केसरकरांच्या विरोधात भाजपाचा युवा प्रदेश सदस्य असलेल्या विशाल परब यांना पाठबळ देऊन सावंतवाडी मतदारसंघात केसरकरांच्या विरोधात उभा करण्याचा डाव आखल्याचे अधोरेखित झाले आहे. कारण, केसरकरांचे सावंतवाडी मतदारसंघावर असलेले वर्चस्व कमी करण्याचा आम.रवींद्र चव्हाण यांचा प्रयत्न नाही ना..? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे विशाल परब यांना विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात उभा राहिल्याने पक्षातून काढून टाकण्यात आले होते. परंतु भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांना भाजपात सन्मानाने परत घेतले. त्यामुळे त्यावेळी विशाल परब याच्या मागे कोण होते हे वेगळे सांगण्याची गरज पडली नाही आणि म्हणूनच हा प्रश्न उपस्थित होण्यास १००% वाव आहेच पण केसरकरांचे वर्चस्व मोडीत काढण्याचेही प्रयत्न असल्याचे दिसून येते.
एकीकडे विशाल परब यांना बळ देऊन रवींद्र चव्हाण यांनी भाजपा मोठा करण्याचा प्रयत्न केला परंतु, हे करत असताना जिल्ह्यातील वजनदार नेतृत्व असलेले संजू परब यांनी निलेश राणेंच्या मागोमाग भाजपला सोडचिठ्ठी देत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात भाजपला म्हणावे असे सक्षम नेतृत्व राहिलेच नाही. त्यामुळे खास.नारायण राणेंचा विरोध झुगारून देखील विशाल परब यांना भाजपात स्वगृही प्रवेश करून घेणे भाग पडले. या सर्व खेळांमध्ये भाजपा पक्षात गेली काही वर्षे तळमळीने काम करणारे काही नेते, कार्यकर्ते मात्र दुखावले गेले. त्यांची “ना घरका ना घाटका” अशी अवस्था होऊनही ते मनाने दूर होऊनही शरीराने भाजपामध्ये राहिलेत.
भाजपाच्या मैत्रीचा विश्वासघात करण्याच्या वृत्तीचा परिणाम झाला तो कणकवली मध्ये..!
कणकवली शहरात शिंदे शिवसेनेचे वर्चस्व कमी आहे. यासाठी माजी आमदार राजन तेली यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. भाजपाच्या विरोधात तेलींच्या जीवावर लढणे कठीण असल्याने पर्यायी उबाठा पक्षाशी युती करून शहर विकास आघाडीची स्थापन केली. माजी नगराध्यक्ष संदेश पारकर या उबाठाच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये संपूर्ण पाठिंबा देऊन आम.निलेश राणे यांनी कणकवली भगवामय करण्याचा चंग बांधला. “रक्ताचे पाणी करून पारकरांना विजयी करणार” अशी प्रतिज्ञा करत भाजपच्या विश्वासघाती राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरुंग लावला आणि राज्यात कुठेही झाली नाही ती शिंदे शिवसेना आणि उबाठा युती शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कणकवली शहरात झाली. या युतीच्या माध्यमातून भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची सत्तेची समीकरणे बिघडली आणि त्याचे लोण राज्यात पसरले तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही. कारण, छोटा पक्ष म्हणत युती करून मैत्री केलेल्या पक्षालाच संपवण्याची भाजपची चाल हळूहळू इतर पक्षांच्या ध्यानात येऊ लागली आहे. त्यामुळे कणकवली सारखे क्रांतिकारी पाऊल उचलले जात असून महायुतीचे पुढे काय होते हे पाहणे जनतेसाठी रंजक ठरत आहे.
