वेंगुर्ला :
वेंगुर्ला शहरात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत चालली असताना भाजपने आपल्या प्रचाराला ‘टर्बो स्पीड’ दिला आहे. प्रदेशाध्यक्ष ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मैदानात थेट उडी घेत प्रभागनिहाय सभा आणि जनसंवादाचे सत्र सुरू केले.
प्रत्येक प्रभागात घेतलेल्या छोट्या-छोट्या कॉर्नर सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कार्यकर्त्यांचाही उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. “वेंगुर्ला नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आणल्याशिवाय मागे हटायचे नाही!” असा दमदार संदेश देत राणेंनी प्रचाराची तापमानपातळीच उंचावली.
या मोहिमेत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप गिरप, प्रभाग क्र. ३ चे उमेदवार विनायक (सुहास) गवंडळकर, गौरी मराठे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वेंगुर्ल्यात भाजपचा प्रचार जसा वेग घेत आहे, त्यावरून आगामी लढत आणखी रोचक होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
