You are currently viewing काळी माय तृषार्त..
Oplus_16908288

काळी माय तृषार्त..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 

*काळी माय तृषार्त…..*

 *तो हतबल !*

 

पडीक नापीक वांझ जमिनीचे

फोफडे जाताहेत सोलत

आग ओकत सूर्य डोक्यावर

केव्हापासून ज्वाला ओकतोय

भेगाळलेल्या जमिनीवर…….

 

तरी , धरतीला नांगरतोय उगीच

फाळ घेऊन मध्यान्हीला उभा

ओसाड शिवारी पाहत पल्याड

माळरानावरील कातळाला…..

 

डोळ्यातील त्याच्या कणव आर्जव

साठलेलं…. ओथंबताहेत अश्रू

नभाकडे अधूनमधून नजर फिरवत

आशेने कपाळाला हात लावून

 

काट्यांतून डोकावणाऱ्या फुलांच्या पाकळ्याही टोचू लागल्या आहेत….

आणि दूरवर पसरलेली पांदण….

वाकुल्या दाखवत हसतेय

कुठे चालायचं आता पावलांनी दिशाहीन जीवन भरकटतय….

 

 

कुमारी राहिलेली काळी माती

माय त्याची भेगाळलेल्या धरेत

हमसून हमसून हुंदके देत राहिलीय….!

घुसमटत अंतरीच्या वेदना तिच्या मौनात

पससदरी…. आपलीच लक्तरे टांगलेली

शुष्क ओसाड काळी माती

नि ओकबोकं रानमाळ….

आभाळाच्या कुशीतून एक तरी

पर्जन्य थेंब शोषण्यास आसवलेला

त्याचा तृषार्त कंठ…..

आक्रंदतोय….

आक्रोशतोय…..

 

कुठे कशी पायवाट तुडवायची

नाही कळतय कृषकाला

 

जगाचा पोशिंदाच राहिलाय भुकेला….!!

 

शेवटी…. शेवटी

एकदाची त्याची वाट संपणाराय..

झाडाच्या फांदीवर

गळफासात तो लटकणाराय….!!..

 

*मानसी जामसंडेकर, गोवा*

प्रतिक्रिया व्यक्त करा