शाहूलखन बांदिवडेकर भारत अ संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये
मालवण / मसुरे :
कतारमध्ये सुरू असलेल्या इमर्जिंग आशिया कप स्पर्धेसाठी भारत ‘अ’ संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मसुरे–बांदिवडेचे सुपुत्र शाहुलखन (शाहू) सतिश बांदिवडेकर यांची निवड झाली असून सर्व स्तरावरून त्यांच्या या यशाचे कौतुक होत आहे. यापूर्वीही शाहू बांदिवडेकर यांची भारतीय ज्युनिअर महिला क्रिकेट संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाली होती.
शाहू बांदिवडेकर हे स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून नावाजले गेले आहेत. जिल्ह्यातील अनेक युवा क्रिकेटपटूंना ते सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. भारतीय ‘अ’ संघासोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत समाधानकारक असून भविष्यात या अनुभवाचा उपयोग सिंधुदुर्गातील क्रिकेटपटूंना नक्कीच होईल, असे मत शाहू यांनी व्यक्त केले.
संघासोबत मुख्य प्रशिक्षक सुनील जोशी, सहाय्यक प्रशिक्षक सैराज बी, फिल्डिंग कोच आर. श्रीधर, व्हिडिओ विश्लेषक देवराज राऊत आणि प्रबंधक स. शौर्य कार्यरत आहेत.
शाहू यांची निवड झाल्याने मसुरे–बांदिवडे परिसरात आनंद व्यक्त होत असून सामाजिक कार्यकर्ते सतीश बांदिवडेकर यांचे ते सुपुत्र आहेत.
