You are currently viewing सांगवी–पिंपळे गुरवमध्ये मोकाट कुत्रे व जनावरांचा उपद्रव;

सांगवी–पिंपळे गुरवमध्ये मोकाट कुत्रे व जनावरांचा उपद्रव;

सांगवी–पिंपळे गुरवमध्ये मोकाट कुत्रे व जनावरांचा उपद्रव; नागरिक भयभीत

सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये आणि गल्लीबोळांत मोकाट कुत्रे आणि जनावरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर चार ते दहा जणांच्या गटाने फिरणाऱ्या या मोकाट कुत्रे व जनावरांमुळे विशेषतः मुलांमध्ये आणि जेष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्यास ते अंगावर धावून येत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, शहरातून गाय-म्हैस-बैल जवळपास गायब होताना दिसत असतानाच मोकाट जनावरांचा प्रश्न वाढत आहे. चिखली येथील सर्वे नं. 1655 मधील पाच एकरांचा गुरांचा गोठा मनपाने विकास आराखड्यात प्रास्तावित केलेला असला तरी तो अद्याप कागदावरच अडकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

नुकताच न्यायालयाने शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुल, उद्याने, बस स्थानके, रेल्वे स्थानक परिसरातून भटकी जनावरे व कुत्रे हटविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसून नियोजनशून्य कारभाराला पशुवैद्यकीय विभाग जबाबदार असल्याचे जोगदंड यांनी सांगितले. नागरिकांना फक्त टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर मोकाट कुत्रे व जनावरांवर तातडीने कारवाई करावी, परिसर सुरक्षित ठेवावा आणि मुलांसह जेष्ठ नागरिकांचा जीवितास धोका निर्माण होऊ नये, अशी मागणी अण्णा जोगदंड यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांना भेटून निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, सचिव गजानन धाराशिवकर, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, महिला अध्यक्षा संगीता जोगदंड आणि शहराध्यक्षा मीनाताई करंजवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटोवर्णन:
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांना निवेदन देताना शहराध्यक्ष अण्णा जोगदंड.

प्रतिक्रिया व्यक्त करा