You are currently viewing सावंतवाडी येथे २३ रोजी संविधान सन्मान परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी येथे २३ रोजी संविधान सन्मान परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

*सावंतवाडी येथे २३ रोजी संविधान सन्मान परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन*

सावंतवाडी (प्रतिनिधी) :

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती, सावंतवाडी यांच्यावतीने संविधान सन्मान परिसंवाद कार्यक्रम दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मीनाक्षी तेंडोलकर, अध्यक्षा – बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजप्रबोधन समन्वय समिती, सावंतवाडी यांचे हस्ते, तर प्रमुख पाहूणे म्हणून जगदीश चव्हाण, उपाध्यक्ष – बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती, सावंतवाडी हे उपस्थित रहाणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून, श्री. संग्राम सावंत, मुख्य संघटक संविधान संवर्धन चळवळ महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत.

सदर परिसंवादामध्ये कु.जेम्स डिसोझा, कणकवली, कुमारी श्रावणी आरवंदेकर, कुडाळ व कु.चिन्मय असणकर, बांदा हे युवा संविधान संवादक म्हणून सहभागी होणार आहेत.

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात भारतीय संविधानाची निर्मिती, त्यातील मूल्ये, नागरिकांची कर्तव्ये आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीत संविधानाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. समाजातील सर्व घटकांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव वाढावी, तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्वांचा प्रसार व्हावा, हा या परिसंवादाचा मुख्य उद्देश आहे.

तरी सदर कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वय समिती अध्यक्ष व सचिव सगुण जाधव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा