नगराध्यक्षासह २० उमेदवारांचा जनसंपर्काचा संकल्प दृढ; शिस्तबद्ध मोहिमेमुळे निवडणुकीची रंगत शिगेला
वेंगुर्ले :
वेंगुर्ले नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाने नगराध्यक्ष आणि दहा प्रभागांतील २० उमेदवारांच्या घरोघरी संपर्क अभियानाला पारंपरिक पद्धतीने सुरुवात केली. जुना एस.टी. स्टँड येथील गणपती मंदिरातील दर्शन तसेच दाभोसवाडा येथील विठ्ठल–रखुमाई मंदिरातील आशीर्वाद घेऊन या प्रचार मोहिमेला प्रारंभ झाला.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, जिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा पार पडला. त्यापूर्वी शहरातील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी आणि कॅम्प येथील स्वामी समर्थ आत्मपादुका मंदिरात सर्व उमेदवारांच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले.
शिवसेना (शिंदे गट) तर्फे नगराध्यक्ष पदासह सर्व २० जागांसाठी उमेदवारी दाखल करण्यात आली असून सर्व उमेदवारांनी घराघरांत जाऊन थेट जनतेशी संवाद साधण्याचा संकल्प केला आहे.
शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या या भव्य आणि शिस्तबद्ध अभियानामुळे वेंगुर्ल्यातील निवडणूक रंगत आणखी वाढली आहे. देवदर्शनाने सुरुवात केलेला हा प्रचार आता घराघरांत पोहोचत असून, पक्षाच्या एकजुटीचे आणि जनसंपर्काच्या निर्धाराचे दर्शन घडवत आहे. आगामी काही दिवसांत हा प्रचार आणखी वेग घेणार असून, वेंगुर्लेकर कोणाला कौल देतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
