मालवण :
“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रत्नागिरी–सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे नेतृत्व मिळत असताना मालवणकरांनी भाजपच्या कमळाला मतदान करून शहराचा विकास गतीमान करावा,” असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले. बुधवारी रात्री झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.
बैठकीत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, देशाचे नेतृत्व करण्याची ताकद जगभरात सिद्ध करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने मालवण शहरासाठी लागणारे प्रकल्प, निधी आणि सुविधा सहज उपलब्ध करून देणे शक्य होईल. त्यामुळे नगरपालिकेत भाजपची सत्ता आणणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन कमळ निशाणीवर मतदान करण्याचे आवाहन करावे, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचतो हे पटवून द्यावे, असा संदेश त्यांनी दिला. कोरोनाकाळात भाजप सरकारने दिलेल्या मोफत लस अभियानाची आठवण करून देत “हजारो जीव वाचविणाऱ्या या उपक्रमाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे,” असे ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्षांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्याबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. “समाजकार्यासाठी ओळख असलेल्या शिल्पा खोत यांना जनतेच्या मागणीनुसार उमेदवारी देण्यात आली आहे. शहराच्या हितासाठी भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले पाहिजेत,” असे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शहर व तालुका पदाधिकारी आणि सर्व उमेदवार उपस्थित होते. विशेष म्हणजे मत्स्यव्यवसाय आणि किनारपट्टी विकास हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची क्षमता फक्त भाजपकडे असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. “नितेश राणे मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यास सक्षम आहेत. पुढील चार वर्षे सरकारही भाजपचेच असणार आहे. त्यामुळे एकसंध सत्तेमुळे शहराचा विकास कुठल्याही अडथळ्याशिवाय शक्य होईल,” असे त्यांनी सांगितले.
शहरातील कार्यकर्त्यांच्या मनातील ऊर्जा पाहून चव्हाण यांनी आत्मविश्वासाने घोषणा केली की, “या वेळी मालवणमध्ये भाजपचीच सत्ता येणार—याबाबत शंका नाही!”
