कणकवलीत निलेश राणेंची गर्जना
कणकवली :
शहर विकास आघाडीच्या भव्य बैठकीत शिवसेनेचे फायरब्रॅण्ड आमदार निलेश राणे यांनी दमदार भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उर्जा संचारली. “लढाईत आपलं-परकं काही नसतं… समोर कोण आहे याची चिंता करू नका. जीवाचं रान करा, रक्ताचं पाणी करा आणि संदेश पारकरांना नगराध्यक्षपदी विजयी करा!” अशा शब्दांत त्यांनी कणकवलीत जोरदार गर्जना केली.
ही बैठक राजन तेली यांच्या निवासस्थानी झाली. ठाकरे गट व शिंदे गट—दोन्ही बाजूच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने आघाडीचे प्रभावी शक्तिप्रदर्शन झाले.
भाषणात आमदार राणे म्हणाले, “नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकरांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा. राजकारणात मी कधी तडजोड केली नाही आणि दगा देणाऱ्यांना आता माफ करणार नाही. गरज पडली तर मला बोलवा; रथी-महारथी कणकवलीत उतरवू. विजयाच्या मार्गावर विकास हा प्रमुख मुद्दा आहे. श्रीकृष्णांचा आदर्श घ्या— शेवटपर्यंत लढणाऱ्यांच्याच पाठीशी कणकवली उभी राहते.”
सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीने “तडजोड नाही, सरळ लढाई” असा स्पष्ट संदेश देत एकजूट दाखवली. निलेश राणेंच्या आक्रमक शैलीतील भाषणामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली आणि निवडणूक मोहीम अधिक धारदार झाली.
