आडाळी एमआयडीसीजवळ दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन…
दोडामार्ग
तालुक्यातील आडाळी येथे आज दिवसाढवळ्या एका बिबट्याचे दर्शन झाले आहे. येथील काही युवक प्रवास करत असताना हा बिबट्या दिसून आला. दिवसाढवळ्या बिबटा दिसल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मोरगाव परिसरातील काही युवक बुधवारी सकाळच्या सुमारास कारने प्रवास करत होते. त्यांची कार आडाळी एमआयडीसीजवळ पोहोचताच रस्त्याच्या मध्यभागी एक बिबट्या उभा असल्याचे त्यांना दिसून आले. अचानक समोर वन्यप्राणी दिसताच वाहनचालकाने गाडी थांबवली. काही क्षण कारसमोरच उभा राहिलेल्या बिबट्याचे त्यांनी फोटो तसेच व्हिडिओ चित्रीकरण केले.
वाहन थांबल्याचे लक्षात येताच बिबट्या काही क्षण स्थिर राहिला आणि नंतर जंगलाच्या दिशेने धूम ठोकत अदृश्य झाला. दिवसाढवळ्या बिबट्या रस्त्यावर दिसल्याची घटना ऐकून पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी याच बिबट्याचे कुंब्रल परिसरातही दर्शन झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे आडाळीत दिसलेला बिबट्या तोच असावा, असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
