सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेनंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. एकूण २० नगरसेवक जागांसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी ९४ अर्ज वैध, तर नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या ११ अर्जांपैकी ६ अर्ज वैध घोषित झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील आणि मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी दिली. छाननीसाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपरिषदेची निवडणूक २ डिसेंबर रोजी होत असून सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज भरताना उत्साह दाखवला आहे. काल अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एकूण ११ अर्ज, तर नगरसेवकांसाठी ११४ अर्ज दाखल झाले होते. आज सकाळी ११ वाजता वॉर्डनिहाय छाननी करण्यात आली.
छाननीत नगराध्यक्ष पदासाठी केवळ ६ अर्ज वैध ठरले आहेत. त्यात
– शिवसेना: सीमा मठकर
– भाजप: श्रद्धाराजे सावंत भोसले
– अपक्ष: अन्नपूर्णा कोरगावकर, निशांत बुराण
– शिवसेना (उबाठा गट): ॲड. निता सावंत–कविटकर
– काँग्रेस: साक्षी वंजारी
यांचा समावेश आहे.
नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या ११४ पैकी २० अर्ज अवैध ठरल्याने, एकूण ९४ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर असल्याने पुढील दोन दिवसांत अनेक प्रभागांतील लढतीचे समीकरण बदलू शकते. अपक्ष उमेदवारांचा निर्णयही याच तारखेनंतर स्पष्ट होणार आहे.
सावंतवाडीतील एकूण दहा प्रभागांमध्ये यंदा शिवसेना, भाजप आणि उबाठा शिवसेना यांच्यात थेट संघर्ष दिसत आहे. काँग्रेसकडून १६ जागांवर उमेदवार दिले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने ५ जागा निवडल्या आहेत. प्रत्येक प्रभागात तुल्यबळ लढत अपेक्षित आहे.
भाजप व शिवसेना यांच्यात मुख्य स्पर्धा निर्माण झाली असून, उबाठा गटाने काही प्रभागांत मजबूत उमेदवार दिल्याने लढत अधिक चुरशीची झाली आहे. काही नाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने त्यांना समजावून घेण्यासाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू आहेत.
२१ नोव्हेंबरनंतर चित्र पूर्णतः स्पष्ट होईल आणि नगराध्यक्षपद तसेच नगरसेवक जागांसाठीची ही निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे.
