*ज्येष्ठ गझलकारा सुनंदा पाटील “गझलनंदा” लिखित अप्रतिम गझल*
*आई आठवते*
देवाजवळी दिवा लावता आई आठवते
कातरवेळी वाट पाहता आई आठवते
रस्त्यावरुनी चालत होते कितीक वेळा मी
उंबरठ्याची ठेच लागता आई आठवते
औषध घेते थकून जाते ताप का हटेना
मीठ मोहरी दृष्ट काढता आई आठवते
दुःखाचीही गर्दी होते दव पापणकाठी
कढ मायेचे उगा दाटता आई आठवते
आयुष्याच्या सायंकाळी मज सोबत नाही
भविष्य बघुनी भिती वाटता आई आठवते
दारी माझ्या श्रावणसरही उदास पाझरते
पुन्हा न येणे तिचे जाणता आई आठवते
मंदिरातली घंटा घणघण रोजच वाजवते
माझ्यापाशी देव कोणता आई आठवते
निघून गेली दूर तरीही आठव तव स्मरतो
आई म्हणुनी हाक ऐकता आई आठवते
*गझलनंदा*
