You are currently viewing कणकवलीत नगराध्यक्षपदाचे ४ आणि नगरसेवक पदाचे ४९ अर्ज वैध…

कणकवलीत नगराध्यक्षपदाचे ४ आणि नगरसेवक पदाचे ४९ अर्ज वैध…

कणकवलीत नगराध्यक्षपदाचे ४ आणि नगरसेवक पदाचे ४९ अर्ज वैध…

भाजप विरोधात क्रांतिकारी विचार पक्ष असा दुरंगी सामना होणार…

कणकवली

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ४ तर नगरसेवक पदासाठी ४९ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. आजच्या छाननी प्रक्रियेत डमी आणि एबी फॉर्म नसलेले अर्ज अवैध ठरविण्यात आले. २१ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी वेळ आहे. कणकवलीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी तर नगरसेवकपदासाठी दुरंगी लढत होण्याची शक्‍यता आहे.

एकूण १७ पैकी भाजपने १६ प्रभागात तर राष्‍ट्रवादीने एका प्रभागात उमेदवारी अर्ज भरला आहे. तर नगराध्यक्षसह सर्व १७ प्रभागांमध्ये शहर आघाडी तथा क्रांतिकारी विचार पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत. कणकवलीत नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार वैध ठरले आहेत.यात समीर नलावडे (भाजप), संदेश पारकर (क्रांतिकारी विचार पक्ष), गणेशप्रसाद पारकर (लोकराज्य जनता पार्टी) आणि सौरभ संदेश पारकर (अपक्ष) यांचा समावेश आहे.

आजच्या छाननी प्रक्रियेवेळी क्रांतीकारी विचार पक्ष आणि भाजपच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धांवर हरकती घेतल्‍या. यात नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री.पारकर यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. नलावडे यांना यापूर्वी एका गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली असल्याचे संदेश पारकर यांच्या वकिलांचे म्हणणे होते. मात्र सदर शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिक्षेला स्थगिती दिली असल्यास निवडणूक लढवता येते, असे समीर नलावडे यांच्या वकिलांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. त्‍यामुळे पारकर यांचा हा आक्षेप देखील फेटाळण्यात आला. समीर नलावडे यांच्यावतीने ॲड. राजेंद्र रावराणे यांनी तर संदेश पारकर यांच्या वतीने ॲड. गणेश पारकर यांनी बाजू मांडली.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपाकडून प्रभाग ३, ५ आणि ७ मधून हरकती घेण्यात आल्‍या. यात प्रभाग ३ मध्ये भाजपच्या स्वप्निल शशिकांत राणे यांनी क्रांतिकारी विचार पक्षाच्या सुमित मारुती राणे, प्रभाग ५ मध्ये भाजपच्या मेघा अजय गांगण यांनी क्रांतिकारी विचार पक्षाच्या स्नेहा निलेश वाळके तर प्रभाग मध्ये ६ भाजपच्या स्नेहा महेंद्र अंधारी यांनी क्रांतिकारी विचार पक्षाच्या सुमेधा सखाराम अंधारी यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्रातील तांत्रिक चुकांबाबत मुद्दा उपस्थित केला. प्रतिज्ञापत्रावर योग्य शिक्के नसणे असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र आक्षेप फेटाळत अर्ज वैध ठरविण्यात आले.

प्रभाग ११ मध्ये क्रांतिकारी विचार पक्षाच्या दीपिका प्रदीपकुमार जाधव यांनी भाजपच्या मयुरी महेंद्र चव्हाण यांच्या विरोधात काही माहिती लपविल्याबाबत आक्षेप घेण्यात आला होता. मात्र हा देखील आक्षेप फेटाळण्यात आला.‌
प्रभाग १६ मध्ये भाजपच्या संजय मधुकर कामतेकर यांनी क्रांतिकारी विचार पक्षाचे उमेश सहदेव वाळके यांच्या विरोधात आक्षेप घेतला. प्रतिज्ञापत्रावरील सूचकाची सही योग्य नसल्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत काही पुरावा आहे का अशी विचारणा केली असता श्री.कामतेकार यांनी पुरावा नसल्याचे सांगितले असल्याने आक्षेप फेटाळण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा