विरोधकांचे त्रुटीपूर्ण अर्ज स्वीकारल्याने संताप;
न्यायालयाच्या दारात जाणार असल्याची समीर नलावडेंची घोषणा
कणकवली
अपूर्ण व त्रुटीपूर्ण कागदपत्रांसह विरोधकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. छाननीदरम्यान या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी विरोधकांना दोन तासांचा वेळ दिला जात असल्याने प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व कागदपत्रे परिपूर्ण असणे बंधनकारक आहे. मात्र अनेक अर्जांवर नोटरीच्या तसेच उमेदवारांच्या सह्या नाहीत, ओळखीचा पुरावा जोडलेला नाही. असे अर्ज सरळ फेटाळायला हवे होते. पण तसे न झाल्याने आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहोत,” असे नलावडे यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत ॲड. राजेंद्र रावराणे उपस्थित होते.
