अन्यायाविरोधात वॉर्ड ६ मधून अपक्ष म्हणून अर्ज दाखल
सावंतवाडी :
माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे सक्रियपणे काम करणारे सावंतवाडी शिवसेनेचे युवा सेना शहर प्रमुख अर्चित पोकळेंची यांची नगरपालिकेतील संभाव्य उमेदवारी नाकारल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. आज त्यांनी शिवसेना उमेदवार देव्या सूर्याजी यांच्या विरोधात वॉर्ड क्रमांक ६ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी नाकारण्यामागे अन्यायकारक कारणे असून, हा निर्णय मी कोणत्याही परिस्थितीत मान्य करणार नाही, असे पोकळे यांनी सांगितले. नगरातील विकासकामांत मी नेहमी सहभागी राहिलो, त्यामुळे ही कारवाई अन्यायकारक आहे, असा आरोप त्यांनी केला.
अर्चित पोकळे म्हणाले की, “नागरिकांसाठी सातत्याने काम करूनही माझी उमेदवारी नाकारणे हे स्पष्टपणे अन्याय आहे. मी वॉर्डातील जनतेच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.”
या निर्णयानंतर कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पोकळेंना न्याय देण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्यासोबत उभे राहिले आहेत. येत्या निवडणुकीत वॉर्ड ६ मध्ये तुफान चुरस पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अर्ज दाखल करताना पोकळेंसोबत समर्थकही उपस्थित होते.
