You are currently viewing सिंधुदुर्गला मिळाला शौर्याचा तुरा – कोकणातील पहिले ‘भोसले सैनिक स्कूल’ सुरू

सिंधुदुर्गला मिळाला शौर्याचा तुरा – कोकणातील पहिले ‘भोसले सैनिक स्कूल’ सुरू

जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेला नवा आयाम; भोसले कुटुंबियांचा तीन वर्षांचा पाठपुरावा यशस्वी

 

सावंतवाडी :

 

शौर्य, पराक्रम आणि देशसेवेची परंपरा लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऐतिहासिक भेट मिळाली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने कोकणातील पहिले सैनिक स्कूल “भोसले सैनिक स्कूल” सुरू झाले असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सैनिकी शिक्षणाची सुवर्णदालने खुली झाली आहेत. यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचालित या भव्य विद्यालयाचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

“सैनिक आणि सैनिक स्कूल आमच्या कुटुंबासाठी जिव्हाळ्याचा विषय” : नितेश राणे

या सोहळ्यात बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “सैनिक आणि सैनिक स्कूल हा आमच्या राणे कुटुंबीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. अलीकडे नाशिक सैनिक स्कूलला भेट दिली तेव्हा असेच आधुनिक आणि सक्षम सैनिक स्कूल आपल्या जिल्ह्यात उभे राहत असल्याचे समजले आणि मनापासून अभिमान वाटला. भोसले सैनिक स्कूल कोकणातील मानाचा शिरपेच ठरेल, याची मला पूर्ण खात्री आहे.”

राणे यांनी पुढे सांगितले की, “आपल्या जिल्ह्यात नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘नौदल दिन’ साजरा झाला आणि आता सैनिक स्कूल सुरू होत आहे. ही आपल्या मुलांसाठी अविश्वसनीय सुवर्णसंधी आहे. कुणी त्रास दिला किंवा अडचण आली तर केवळ एक फोन करा—तुमची अडचण म्हणजे माझी अडचण.”

राणे यांनी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्यासाठी केलेल्या शैक्षणिक कार्याचाही उल्लेख करून त्यांना अभिवादन केले.

“सावंतवाडीत सैनिक स्कूल – हा सन्मानाचा क्षण” : आ. दीपक केसरकर

या प्रसंगी आमदार दीपक केसरकर म्हणाले, “सावंतवाडी तालुक्यात सैनिक स्कूल होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. डिप्लोमा कॉलेजपासून सुरू झालेल्या ‘भोसले नॉलेज सिटी’चा आज विस्तार होताना पाहून आनंद वाटतो. परफेक्शन ही अच्युत सावंत-भोसले यांची खासियत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाची मान्यता मिळालेल्या अवघ्या निवडक संस्थांपैकी ही एक संस्था आहे.”

स्थानिक आमदार म्हणून या उपक्रमाचा अभिमान असल्याचे सांगत त्यांनी या शाळेच्या वाटचालीसाठी सदैव पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

सैनिक स्कूलचे स्वप्न — तीन वर्षांच्या अखंड प्रयत्नानंतर साकार

भोसले कुटुंबीयांनी सैनिक स्कूल स्थापनेचे स्वप्न अनेक वर्षे जोपासले होते. डिप्लोमा कॉलेज, फार्मसी कॉलेज आणि नंतर सैनिक स्कूल — अशा टप्प्याटप्प्याने उभारलेल्या शैक्षणिक साम्राज्याचा हा आजचा सुवर्ण टप्पा आहे.

विद्यार्थ्यांमधील शिस्तीचा अभाव दूर करून सक्षम, शिस्तबद्ध व राष्ट्रनिष्ठ अधिकारी घडवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अखंड तीन वर्षे प्रयत्न करण्यात आले. अखेर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाची मान्यता मिळाली आणि सैनिक स्कूलचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.

“सैन्यातील अधिकारी कसे घडतात याचा पाया घालण्याचे काम हे स्कूल करणार आहे. हा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा आहे,” असे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी सांगितले.

 

सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती

या भव्य उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कार्याध्यक्ष अच्युत भोसले, अध्यक्षा ॲड. अस्मिता भोसले, सचिव संजीव देसाई, स्कूलचे सीईओ रत्नेश सिन्हा, ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, निरज चौधरकर, मेजर विनय देगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भोसले सैनिक स्कूलचे चीफ एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर रत्नेश सिन्हा यांनी शाळेची रचना, अभ्यासक्रम, प्रशिक्षण पद्धती आणि भविष्यातील योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमर प्रभू यांनी केले.

*जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी*

भोसले सैनिक स्कूल सुरू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सैनिकी करिअरची नवी दिशा मिळणार असून शिस्त, निष्ठा, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेच्या मूल्यांची रुजवण या शाळेतून होणार आहे.

भविष्यात या शाळेतून घडणारे अधिकारी “आम्ही भोसले सैनिक स्कूलमध्ये शिकलो” असा अभिमानाने उल्लेख करतील; तो क्षण जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदला जाईल, अशी भावना सर्व मान्यवरांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा