जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाकडून बालदिन उत्साहात साजरा..
चिपळूण, मांडकी-पालवण,
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील विद्यार्थिनींनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पालवण क्रमांक एक येथील विद्यार्थ्यांसोबत बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
या बाल दिनानिमित्त जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्राथमिक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आणि खेळांचे आयोजन केले. यामध्ये चित्रकला, रंगभरण स्पर्धा, आणि संगीत खुर्ची यांसारखे मनोरंजक खेळ घेण्यात आले. विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत दिवस व्यतीत केला. या स्पर्धांमधून विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना निवडून त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालवण क्रमांक एकच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहल संतोषकुमार भुवड यांनी भूषवले. आपल्या भाषणामध्ये सौ. भुवड यांनी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण बाहेर येतात आणि असे उपक्रम सतत साजरे व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहल भुवड, सौ. कविता पाटील, श्री. शंकर गुरसाळे, श्री. मोहन सिंग पाडवी इत्यादी शिक्षकवृंद, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापिका, विद्यार्थिनी आणि जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
