सिंधुदुर्ग :
आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट)ने राजकीय रणनितीची मोठी पावले उचलली आहेत. पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा केली. मंत्री, खासदार, आमदार अशा वरिष्ठ नेतृत्वावर जबाबदारी सोपवून शिंदे गटाने निवडणुकीत जोरदार तयारी केल्याचे या यादीतून स्पष्ट दिसून येते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रभारी म्हणून आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर रत्नागिरीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, मंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत आणि माजी आमदार राजन साळवी या वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या या नव्या रणनीतीत संघटन बळकटीकरणावर विशेष भर आहे. प्रत्येक जिल्ह्यात मजबूत जाळे निर्माण करून महायुती आणि शिवसेनेचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न या नियुक्त्यांतून दिसून येतो.
नियुक्त प्रभारींना कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे, पक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे, राज्य सरकारच्या लोकहिताच्या योजनांची माहिती देणे आणि निवडणुकीसाठी संगठित मोहीम उभी करणे अशी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शिवसेनेची ही घोषणा होताच जिल्हास्तरावर चर्चा रंगू लागली असून आगामी निवडणुकांसाठी शिंदे गटाची तयारी ‘फुल स्विंग’मध्ये गेल्याचे राजकीय वर्तुळात समजते.

