You are currently viewing सावंतवाडीमध्ये सीमा मठकर यांचा शिवसेनेत प्रवेश; महाविकास आघाडीचा विजय निश्चित –  विनायक राऊत

सावंतवाडीमध्ये सीमा मठकर यांचा शिवसेनेत प्रवेश; महाविकास आघाडीचा विजय निश्चित – विनायक राऊत

सावंतवाडीमध्ये सीमा मठकर यांचा शिवसेनेत प्रवेश; महाविकास आघाडीचा विजय निश्चित — विनायक राऊत

“फसवणूक करणारे सरकार सत्तेत; उद्धव ठाकरेमुळेच सिंधुदुर्गचा विकास शक्य झाला”

सावंतवाडी :

माजी आमदार जयानंद मठकर यांच्या सुनबाई सौ. सीमा मठकर यांचा समर्थकांसह शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रवेश झाला. या प्रवेशानिमित्त आयोजित सभेत बोलताना माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीचं संपूर्ण पॅनल सीमाताईंसह विजयी होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

श्रीराम वाचन मंदिर येथे झालेल्या सभेत राऊत म्हणाले, “सावंतवाडीत मला ५ हजार मते मिळाली. पैसा नसल्याने थोडं कमी पडलो, पण ही मतं माझ्यासाठी अभिमानाची आहेत. अनेकांनी जयानंद मठकरांना गुरू मानलं, पण काहीजणांनी गुरूला फसवलं. अशा फसवणाऱ्यांविरोधात उभं राहणं हीच खरी शिवसेना आहे.”

ते पुढे म्हणाले, “राज्यात सध्या फसवणूक करणारं सरकार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सिंधुदुर्गनगरीचा कायापालट झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यांच्या प्रयत्नांमुळे उभं राहिलं. पण, आज एक हजार कोटींचा निधी निष्क्रिय आहे. १२ टक्के कमिशनसाठी सध्याच्या आरोग्यमंत्र्यांनी टेंडर काढले नाहीत, असा गंभीर आरोप मी करतो.”

राऊत यांनी सावंतवाडीतील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि विकास कामांवर टीका करताना सांगितले की, “इथले पालकमंत्री फक्त मटका अड्ड्यांवर धाडी मारतात. पण ड्रग्सचा व्यापार आणि दारूचे अड्डे त्यांना दिसत नाहीत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“सिंधुदुर्गचा विकास सावंतवाडीतून सुरू होणार आहे. पोलिस यंत्रणेला दबावाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण प्रामाणिक अधिकारी झुकणार नाहीत. अशा वेळी शिवसेना त्यांच्यासोबत ठाम उभी राहील,” असे राऊत म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, “आज आम्ही महाविकास आघाडीचे अर्ज भरत आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि मनसे आमच्यासोबत आहेत.”

राऊत यांनी आवाहन केले, “विचारांनी नेतृत्व करणाऱ्या सीमा मठकर यांच्या मशालीला साथ द्या. सुसंस्कृत, प्रामाणिक नेतृत्वाचं समर्थन करा.”

या कार्यक्रमात आर्या सुभेदार, कृतिका कोरगावकर, नियाज शेख, तेजल कोरगावकर, माजी आत्माराम नाटेकर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी अरूण दुधवडकर, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, श्रेया परब, सुकन्या नरसुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अरूण दुधवडकर म्हणाले, “सावंतवाडीकरांची साथ आम्हाला आहे. सुसंस्कृत उमेदवारांना जनता आशीर्वाद देईल.”
जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी “नगराध्यक्ष आमचाच होईल” असा विश्वास व्यक्त केला, तर रूपेश राऊळ म्हणाले, “सेनेचा भगवा फडकावून उद्धव ठाकरे यांची शाबासकी मिळवू.”

सभागृहात शिवसैनिकांनी “जय शिवसेना”, “उद्धव ठाकरे यांचा विजय असो” अशा घोषणा देत उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा