*सौ. सीमा मठकर महाविकास आघाडीच्या उमेदवार*
*माजी खासदार विनायक राऊत*
सावंतवाडी:
सावंतवाडी, वेंगुर्ला महाविकास आघाडीची चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा मठकर यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करत आहोत. सौ. मठकर यांना वारसा आहे, सामाजिक कार्याच व्रत त्यांनी घेतलं आहे. पैशाच्या, भ्रष्टाचाराच्या राजकारणात त्यांनी तत्व जपलं आहे. त्यामुळे सावंतवाडीकर त्यांना आशीर्वाद देतील असा विश्वास माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
ते पुढे म्हणाले, कॉग्रेसच्या वरिष्ठांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही.कॉग्रेसच्या वरिष्ठांवर आमचा विश्वास आहे. ते योग्य ती दखल घेतील. कणकवलीतील नगरविकास आघाडी ही पालकमंत्र्यांच्या हैदोसा विरोधात आहे. शहराच्या हितासाठी ती आघाडी होत आहे. कोणत्याही पक्षाला घेऊन ती आघाडी होत नाही आहे. शिंदे सेना किंवा भाजपला घेऊन आम्ही दळभद्री राजकारण करणार नाही. माजी आमदार वैभव नाईक यांनी देखील याबाबत भुमिका स्पष्ट केली आहे. नारायण राणे आणि रविंद्र चव्हाणांचे दोन गट एकमेकांच्या विरोधात आहेत. नितेश राणे आणि निलेश राणेंनी कोण मोठा हे दाखवून देण्याचा विडा उचलला आहे. स्वतःचे कार्यकर्ते नसल्याने इतरांचे विकत घेत आहेत. स्वार्थी अन् पैशाला हपापलेले लोक आम्हाला सोडून गेले. निष्ठावंत शिवसैनिक आमच्यासोबतच आहेत असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उबाठा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, सुकन्या नरसुले, उमेदवार सीमा मठकर आदी उपस्थित होते.
