जिल्ह्यात विविध ठिकाणी सहकारी मेळावे; सहकार बळकटीसाठी जनसहभागाचे आवाहन
सिंधुदुर्ग :
दरवर्षी १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जाणारा सहकार सप्ताह हा सहकारी चळवळीचा एक महत्त्वाचा उत्सव आहे. या आठवड्यात देशभरातील सर्व सहकारी संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून सहकाराचा प्रचार व प्रसार करतात.
यंदा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ मर्या. यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाचे उद्घाटन दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. मनिष प्र. दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व माजी अध्यक्ष मा. आर. टी. मर्गज यांच्या हस्ते होणार आहे.
या कालावधीत विविध तालुक्यांमध्ये सहकारी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत :
१५ नोव्हेंबर: देवगड, कणकवली, वैभववाडी मेळावा — जामसंडे येथे सकाळी १०.३० वा.
१६ नोव्हेंबर: दोडामार्ग मेळावा — कळणे हायस्कूल येथे सकाळी १०.३० वा.
१७ नोव्हेंबर: सावंतवाडी मेळावा — कोलगाव विकास सेवा सोसायटी येथे सकाळी १०.३० वा.
१८ नोव्हेंबर: कुडाळ मेळावा — कुडाळ खरेदी विक्री संघ येथे सकाळी १०.३० वा.
१९ नोव्हेंबर: वेंगुर्ला मेळावा — स्वयंमेश्वर प्रा.सा.वि.का.स सेवा सोसायटी येथे सकाळी १०.३० वा.
२० नोव्हेंबर: समारोप — जानकी हॉटेल, कुंभारमाठ, मालवण येथे सकाळी १०.३० वा.
या सप्ताहातून सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी, महिला, युवक, लघु व्यापारी आणि ग्राहक यांना सहकाराच्या माध्यमातून सक्षम बनवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. मनिष दळवी आणि सहकारी मंडळाचे अध्यक्ष गजानन सं. सावंत यांनी जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना या सहकार उत्सवात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
