You are currently viewing वास्तव

वास्तव

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते यांच्या काव्याचे लेखक कवी विनय पारखी यांनी केलेलं रसग्रहण*

 

*वास्तव*

 

आज आटली शब्दगंगा

वितळल्या प्रीतीभावना

विर्घळल्या आत्मसंवेदना

रुजल्या स्वार्थी संकल्पना

 

गगन उदास कल्लोळलेले

निर्जीव साऱ्या प्रीतभावना

सुखाचे महालही मृगजळी

भौतिक वैभवाचीच याचना

 

अशाश्वत अर्थहीन जगणे

शुचितेच्याच व्यर्थ वल्गना

जगण्याचाही अर्थ संभ्रमी

भुलवी भव्यदिव्य लोचना

 

ओलावा प्रीतीचाच दुर्मिळ

निष्पाप स्पर्श तो जाणवेना

अर्थही जगण्याचेच बदलले

सत्यार्थ उमजेल कां ? मना

 

जन्म मृत्यू प्रवास अनभिज्ञ

कळते वास्तवा बिलगताना

आता सांजाळ गुलमुसलेली

दिसतो सावळा खुणावताना

 

वि.ग.सातपुते. (भावकवी)

 

आप्पांनी या कवितेत मानवी मनातील भावनांचे होणारे बदल आणि आजकाल वाढत चाललेली स्वार्थी वृत्ती यावर भाष्य केले आहे. आप्पांना ज्यावेळी काव्य स्फूर्त त्यावेळी आप्पा नेहमी मनातील भावनांचा विचार करतात म्हणूनच त्यांना भावकवी असे म्हणतात. या कवितेत मनातील भावनांचा विचार करता त्यांनी नात्यात आलेले कृत्रिम संबंध आणि भौतिक जीवनाच्या वास्तवावर प्रकाश टाकला आहे. स्मार्ट फोन, इंटरनेटने आज जग जवळ आले असले तरी त्यात दिखाऊपणा आहे. त्यात तंत्रज्ञानाचे सुख आहे परंतु प्रत्यक्ष इंद्रियांनी अनुभवता येणारा आनंद नाही. शब्दांची जागा चिन्हांनी घेतली आहे. लोकं खरं हास्य, खरा संवाद जाणीवपूर्वक विसरत चालले आहेत. फक्त स्माईली, कॉपी पेस्ट सारखे आभासी तंत्रज्ञानाने युक्त असे शॉर्टकट वापरत चालले आहेत. संवेदना बोथट झाल्या आहेत. मग अशा वेळी हृदयातून शब्द कसे स्फुरणार? सर्वत्र भौतीक क्षणभंगुर सुखाचा स्वार्थ लोकं शोधात आहेत. वास्तविक पाहता सुख हे मृगजळा सारखे आहे. सुखाला अप्रूप ओसरण्याचा शाप आहे हेच लोकं विसरत चालले आहेत.

 

आजचे युग हे जाहिरातीचे युग आहे. लोक जाहिरातीतील मृगजळाला फसतात. भव्य, दिखाऊ आणि आकर्षक गोष्टींमुळे त्यांची फसवणूक होते. सारासार विवेकबुद्धी ते वापरत नाहीत. वास्तविक पाहता जीवन अशाश्वत आहे तरीसुद्धा फक्त सुखाच्या मोहापायी ते निरर्थक गोष्टीला महत्त्व देतात, खोट्या प्रतिष्ठतेच्या बढाया मारतात आणि स्वतःचीच स्वतः फसवणूक करून घेतात. काय योग्य आणि काय अयोग्य ह्यांचा साधा विचार सुद्धा करत नाहीत. त्यामुळे त्यांचे सारे जीवन अर्थहीन झाल्यासारखे वाटते. मग भावकवी असलेल्या आप्पांच्या मनात एक शंका उत्पन्न होते … “की अशा लोकांना जीवनाचा खरा अर्थ कधी तरी समजेल का ? माणुसकीची भावना जी पूर्वी दिसायची ती परत त्यांच्यात दिसेल का ? त्यांना त्यांचा जीवनाचा खरा आनंद गवसेल का ?”

 

वास्तविक पाहता जन्म आणि मृत्यू आणि त्याच्या मधील जीवन प्रवास ह्यातलं गूढ आपल्याला काहीच माहिती नसतं. सारा खेळ विधात्याचा असतो आपण निमित्त मात्र असतो. आयुष्यातील सत्य आपल्याला त्यावेळी समजतं ज्यावेळी आपण त्याचा अनुभव घेतो. मग तो इंद्रियांद्वारे असेल किंवा अंतःचक्षू द्वारे घेतलेला अनुभव असेल. आयुष्याचा शेवटचा टप्पा हा मृत्यू आहे. आत्ता पर्यंत हव्यासापोटी आपण जी मोह-माया जमविली ती इथेच सोडून जायचे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही या जीवनाच्या प्रवासात अर्थ, वित्त या बरोबर जीवनाचा खरा आनंद उपभोगता. हे जीवन ज्याने आपल्याला दिले आहे त्याला नित्य स्मरा. मी पणाच्या अहंकारात न अडकता जीवनाचा खरा अर्थ समजून घ्या. शेवटी कर्ता करविता तोच आहे आपण निमित्त मात्र आहोत ह्याची जाणीव ठेवा हा संदेश आप्पा या कवितेतून आपल्याला देतात.

 

*(c) विनय पारखी*(मुंबई )

प्रतिक्रिया व्यक्त करा