*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चिपाटे…*
पिळून पिळून झाली चिपाटे शुष्क झाल्या बायका
वाळल्या जणू त्या सुरकुतलेल्या जळमटलेल्या
खारका..
चाटीत जिभल्या श्वापदे ती घराघरातून असती किती
शरण जाती रोज साऱ्या बाहेर असते किती भिती…
काय सांगावे कुणाला नाव मध्य सागरी
किती भराव्या डोहातून त्या यातनांच्या घागरी…
घागरी ही सारख्या हो यातना ही सारख्या
बंद कुलूपाआड साऱ्या तोबऱ्यांनी होती मुक्या…
तिची नि माझी कहाणी फरक काडीचा नसे
कां मी बोलू आणि सांगू करून घ्याया माझे हसे..
नजर सांगतेच सारे चेहराही बोलतो
दहशतीचा मामला हो रोज पिऊन मारतो..
संपतील यातना हो शेवटी सरणावरी
फरक काय तेथे येथे सुटका होईल ती खरी…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
