* *कवी केशवसुत स्मृतिदिनी भगवती हायस्कूल मुणगे येथे ग्रंथदान सोहळा*
*भालचंद्र माटवकर यांची ग्रंथ भेट*
देवगड
* शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभिजात मराठीची गोडी वाढावी, मराठी भाषेच्या शब्दांच्या कूळकथा आणि मूळकथा विद्यार्थी,शिक्षक आणि पालक यांना ज्ञात व्हाव्यात,या उद्देशाने कोकण मराठी साहित्य परिषदेचे आजीव सदस्य आणि उद्योगपती भालचंद्र माटवकर (पोयरे. मशवी) यांनी आधुनिक मराठी काव्याचे जनक,कवी केशवसुत यांच्या स्मृतिदिनाचे औचित्त्य साधून, भगवती हायस्कूल (मुणगे, देवगड )प्रशालेच्या इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना ग्रंथदान केले. भालचंद्र माटवकर यांनी सुरेश ठाकूर लिखित *शब्दांच्या पलीकडले* ‘या पुस्तकाच्या 50 प्रतींचे वाटप विद्यार्थ्यांना केले. सदर ग्रंथदानाचा सोहळा भगवती हायस्कूल मुणगे च्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय सुरेश बांदेकर, उपाध्यक्ष – भगवती एज्युकेशन सोसायटी हे होते. व्यासपीठावर विलास मुणगेकर ( उपाध्यक्ष )तसेच हरीश महाले, तेजस बागडे, सुविद्या बोरकर आदी शिक्षकवर्गही उपस्थित होते .
या ग्रंथदानाबद्दल संस्थेच्या वतीने श्री भालचंद्र माटवकर यांचा सुरेश बांदेकर यांच्या शुभहस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात बांदेकर म्हणाले, “माटवकर यांचे हे ग्रंथ योगदान आमच्या विद्यार्थी,शिक्षक आणि पालक वर्गासाठी फार मोलाचे आहे.सुरेश ठाकूर यांचे हे पुस्तक म्हणजे मुलांना मराठीची गोडी लावणारे पुस्तक आहे. त्यांचे हे अक्षर योगदानही आमच्यासाठी एक अक्षर देणगीच आहे.”
यावेळी मनोज मुणगेकर,नामदेव बागवे, स्वप्निल कांदळगावकर या शिक्षकेतर कर्मचारी वर्गासोबत पालक वर्ग ही उपस्थित होता.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी तवटे यांनी आपल्या नेहमीच्या रंगात केले. सर्वांचे आभार प्रसाद बागवे यांनी मानले.
