सावंतवाडीत मोफत महा आरोग्य शिबीर :
पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट व आरजी स्टोन हॉस्पिटलचा उपक्रम
सावंतवाडी (प्रतिनिधी) :
पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट आणि आरजी स्टोन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना मोफत सल्ला व मोफत तपासणी मिळणार असल्याची माहिती डॉ. रूत्वीज पाटणकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. पाटणकर यांनी सांगितले की, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात हे शिबीर होणार आहे. या शिबिरात मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी, पित्तशय खडे, हर्निया, मूळव्याध, ओव्हरीयन सिस्ट, गर्भाशयाच्या गाठी यांसारख्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला दिला जाणार आहे. तसेच आहारतज्ञांचा सल्ला, डोळे तपासणी, हिमोग्लोबिन, रक्त शर्करा, युरोफ्लोमेट्री आदींच्या मोफत तपासण्या होणार आहेत.
डॉ. पाटणकर म्हणाले, “मी पूर्वी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होतो. आता आरजी स्टोन हॉस्पिटलशी जोडला गेलो असून माझ्या जन्मभूमीतील नागरिकांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळावा यासाठी हा उपक्रम राबवला आहे.”
याचबरोबर त्यांनी सांगितले की, शिबिरानंतर दर रविवारी सावंतवाडीत आरजी स्टोन हॉस्पिटलतर्फे नियमित ओपीडी सुरू करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला डॉ. भावेश पटेल, ॲड. रूजूल पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
