रत्नागिरीचे नवे जिल्हा सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
प्रामाणिक कार्यशैली, पारदर्शक कारभार आणि लोकस्नेहामुळे मिळाली मोठी जबाबदारी
कुडाळ :
कुडाळ तहसीलदार म्हणून उल्लेखनीय कार्य करणारे वीरसिंग वसावे यांची अलीकडेच जिल्हा सहनिबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, रत्नागिरी या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
वीरसिंग वसावे यांनी ५ फेब्रुवारी २०२४ रोजी कुडाळ तहसीलदार म्हणून कार्यभार स्वीकारला होता. अल्पावधीतच त्यांनी महसूल विभागाशी संबंधित विविध जनतेच्या कामांना गती देत अनेक उपक्रम यशस्वी राबविले. शाळा तिथे दाखले शिबिर या उपक्रमाने कुडाळ तहसीलला जिल्ह्यात क्रमांक एक स्थानी आणले. ‘जीवंत सातबारा’ मोहीम, ‘ऍग्रीस्टॅक’ यांसारख्या उपक्रमांपासून ते टेनेन्सी, एनएलटी, जन्म-मृत्यू नोंदणी, ८५अ प्रकरणे, सेवा पंधरवडा उपक्रम, संजय गांधी निराधार योजना, वंश तपासणी आदी महसूल प्रकरणे त्यांनी तत्परतेने व पारदर्शकतेने निकाली काढली.
पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्य केले आणि नागरिकांना दिलासा दिला. त्यांच्या जनसंपर्क व न्यायनिष्ठ कार्यशैलीमुळे जनतेत विश्वास आणि आदर निर्माण झाला.
त्यांच्या या प्रामाणिक व जनहितकारी कामगिरीची दखल घेत शासनाने त्यांची जिल्हा सहनिबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, रत्नागिरी या पदावर पदोन्नती केली. या पदोन्नतीनंतर विविध सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक आणि सहकारी अधिकारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
