*घारपी शाळेत दिल्ली स्फोटातील नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली*
*बांदा*
देशाची राजधानी दिल्ली येथे घडलेल्या भीषण स्फोटात हौतात्म्य प्राप्त झालेल्या निरपराध नागरिकांना घारपी येथील जिल्हा परिषद शाळेत आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून, शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमाची सुरुवात स्फोटात जीव गमावलेल्या नागरिकांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री जे.डी.पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अशा अमानुष घटनांमुळे समाजात भीती आणि असुरक्षितता निर्माण होते. मात्र, अशा काळात नागरिकांनी एकजूट राखणे आणि शांततेचा संदेश देणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना संवेदनशील, जागरूक आणि जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.
