*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भुरळ*
सूर स्पर्शून जातो,
आणि वेळ थांबते
क्षणभर…
काही न ऐकलेले
ऐकू येतात
मौनातले तरंग.
ताल झुलतो,
मन लयीत
हेलकावे घेतं.
पावलांखाली
जमिनीवरून
एक अदृश्य
नर्तन सुरू होतं.
हृदयात कंप
उठतो हलका,
स्वर थरथरतो
ओठांवरचा.
श्वास आणि नाद
मिसळतात,
क्षणभर मी ,
मी राहत नाही.
कधी राग यमनात
संध्या उजळते,
कधी भैरवीत
प्रभात जागते.
नाद लहरींनी
हलकेच डोळे मिटतात,
आणि आत खोल
काहीतरी फुलतं … नि:शब्द.
सुरांचं विश्व
हेच खरं मंदिर,
तिथे देवही थबकतो
ऐकायला.
मी, स्वर,
आणि शांतता
तीनही एक होतात
क्षणभर.
संगीताची ही भुरळ
ना संपणारी,
ना सापडणारी…
तीच तर ओळख,
जी ऐकू येत नाही
पण जगवत राहते
©️®️ डॉ मानसी पाटील
मुंबई
