You are currently viewing दृष्टिबाधितांचा स्नेहमेळावा उत्साहात पार

दृष्टिबाधितांचा स्नेहमेळावा उत्साहात पार

दृष्टिबाधितांचा स्नेहमेळावा उत्साहात पार –

नॅब सावंतवाडीचा उपक्रम कौतुकास्पद

सावंतवाडी :

नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड (नॅब) सिंधुदुर्ग शाखेतर्फे दृष्टिबाधितांचा स्नेहमेळावा नुकताच नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी येथील पहिल्या मजल्यावरील सभागृहात उत्साहात पार पडला.

या स्नेहमेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथील मोटार वाहन निरीक्षक मा. श्री. रत्नकांत शंकर ढोबळ तसेच इनरव्हील क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षा सौ. मृणालिनी कशाळीकर उपस्थित होत्या. जिल्हाभरातून दृष्टिबाधित बांधव या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने हजर झाले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नॅबचे सचिव श्री. सोमनाथ जिगजिन्नी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. नॅबचे अध्यक्ष श्री. अनंत उचगांवकर यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजवरच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेमार्फत दृष्टिबाधितांच्या अडचणी, त्यांच्या पुनर्वसनासाठी होत असलेले प्रयत्न आणि नॅब नेत्र रुग्णालयाच्या सेवांची माहिती त्यांनी दिली.

यावेळी १०० टक्के दृष्टिबाधित भागिनी सौ. रत्नप्रभा मेमन यांना डॉ. कश्यप देशपांडे (सावंतवाडी) यांनी दिलेला वॉकर सुपूर्द करण्यात आला. तसेच कु. अर्पिता दळवी हिला पांढरी काठी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात दोन नव्या दृष्टिबाधितांची नोंदणी देखील करण्यात आली – श्री. उमेश लक्ष्मण पेडणेकर (माजगाव, सावंतवाडी) व श्री. संतोष यशवंत नाईक (तुळस, वेंगुर्ला).

सौ. मृणालिनी कशाळीकर यांनी दृष्टिबाधितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे श्री. रत्नकांत ढोबळ यांनी नॅब संस्थेच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात या उपक्रमात सहकार्याचे आश्वासन दिले आणि संस्थेला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी सचिव श्री. सोमनाथ जिगजिन्नी यांनी आभार प्रदर्शन केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा