You are currently viewing इंद्रधनुष्य २०२५” राज्यस्तरीय युवा महोत्सवात आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचा हर्ष नकाशे ठरला चमकता तारा

इंद्रधनुष्य २०२५” राज्यस्तरीय युवा महोत्सवात आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचा हर्ष नकाशे ठरला चमकता तारा

*इंद्रधनुष्य २०२५” राज्यस्तरीय युवा महोत्सवात आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचा हर्ष नकाशे ठरला चमकता तारा*-

-*पाच पदकांसह महाराष्ट्रात घवघवीत यश!*

वैभववाडी,

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आयोजित “इंद्रधनुष्य २०२५” या २१ व्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे २५ विद्यापीठांमधील प्रतिभावान विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांतून आपल्या कलागुणांचा बहारदार आविष्कार सादर केला. या प्रतिष्ठित महोत्सवात मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र व आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. हर्ष संजय नकाशे यांनी आपल्या उत्कृष्ट कलागुणांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत राज्यस्तरावर भव्य यश संपादन केले. हर्ष नकाशे यांनी संगीत क्षेत्रातील विविध प्रकारांमध्ये आपली प्रतिभा सिध्द करत पाच पदके जिंकली. यामध्ये भारतीय शास्त्रीय गायनात सुवर्ण पदक, भारतीय समूह गायनात सुवर्ण पदक, पाश्चिमात्य समूह गायनात सुवर्ण पदक, नाट्यसंगीत गायनात रौप्य पदक, भारतीय लोकवाद्य संगीत गायनात रौप्य पदक व भारतीय लोकवाद्य गायनात रौप्य पदक प्राप्त केले आहे.

या उत्कृष्ट कामगिरीमुळे हर्ष नकाशे यांनी मुंबई विद्यापीठाचे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उंचावले आहे. राज्यभरातील कठीण स्पर्धेत, अनेक नामांकित कलाकारांमध्ये स्पर्धा करत हर्षने मिळवलेले यश अत्यंत उल्लेखनीय ठरले आहे. हर्षच्या यशामागे त्याची सातत्यपूर्ण साधना, कलेप्रती असलेली प्रगाढ निष्ठा आणि मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन हे घटक स्पष्टपणे जाणवतात. या भव्य यशानंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कलाक्षेत्रात हर्ष नकाशे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी हर्ष नकाशेचे विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले, “हर्ष याच्या कलेतील सातत्य, साधना आणि त्यामागची समर्पित भावना प्रेरणादायी आहे. तो भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच संगीत क्षेत्रात आपला ठसा उमठवेल, अशी खात्री वाटते.”

संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हर्ष नकाशेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी यांनी सांगितले की, “हर्षचे यश हे त्याच्या मेहनतीचे आणि महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे फलित आहे. हे यश संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कलाक्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून, हर्ष नकाशे हा पुढील पिढीतील संगीत क्षेत्रातील प्रेरणास्थान ठरत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा