You are currently viewing गोव्यातील विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत श्री चेस अकॅडमीचा प्रेरणादायी प्रवास!

गोव्यातील विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत श्री चेस अकॅडमीचा प्रेरणादायी प्रवास!

कणकवली (प्रतिनिधी):

“मोठं स्वप्न बघा आणि त्याकडे चालायला सुरुवात करा” – या विचाराचं जिवंत उदाहरण नुकतंच श्री चेस अकॅडमी, कणकवली ने घालून दिलं आहे. अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी गोव्यात आयोजित विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेला भेट देत जागतिक दर्जाच्या खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष पाहण्याचा अविस्मरणीय अनुभव घेतला.

या प्रेरणादायी प्रवासाचे नेतृत्व अकॅडमीचे प्रशिक्षक श्रीकृष्ण आडेलकर सर यांनी केले. त्यांच्यासोबत बुद्धिबळपटू वरद तवटे, सुष्रुत नानल, रुद्र मोबरकर, मीनल सुलेभावी, तनीष्का आडेलकर, तसेच पालक व मार्गदर्शक राजेंद्र तवटे सर, आणि मुलांना प्रोत्साहन देणारे बुद्धिबळप्रेमी श्री जयेश मालांडकर सर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत प्रत्यक्ष पाहिलेले काही जागतिक दर्जाचे खेळाडू म्हणजे –

डी. गुकेश, अर्जुन एरिगैसी, आर. प्रग्गनानंधा, विदित संतोष गुज्राथी, पेंटाला हरिकृष्ण, प्रणव वेंकटेश, एस. एल. नारायणन, कार्तिक वेंकटरमण, दिप्तयान घोष (भारत), तसेच फ्रेडरिक स्वाने, विन्सेन्ट केमर, मॅथीअस ब्लूबॉम, अलेक्झांडर डोन्चेनको (जर्मनी), जोस एदुआर्डो मार्टिनेज अलकांतारा (मेक्सिको), नोदिर्बेक अब्दुसत्तोरोव (उझबेकिस्तान), वेई यी, यू यांगयी (चीन), परहम मग्हसूडलू (इरान), मॅक्सिमे वाशिये-लाग्रव (फ्रान्स), व्लादिस्लाव अरटेमीव, अँड्रेई एसिपेनको (रशिया), शख्रियार ममेद्यारोव (अझरबैजान), लोरेंझो लोदीची (इटली), तितास स्ट्रेमा्वीशियस (लिथुआनिया) आणि सं शँकलँड (अमेरिका).

या सर्व जागतिक बुद्धिबळपटूंना प्रत्यक्ष खेळताना पाहणे हे विद्यार्थ्यांसाठी स्वप्नवत आणि प्रेरणादायी ठरले. प्रत्येक चाल, प्रत्येक विचार, प्रत्येक रणनीती – शिकण्याचा एक अमूल्य धडा होता.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भारतीय बुद्धिबळातील गौरवशाली नाव मास्टर अभिजीत कुंटे यांच्यासोबत फोटो घेण्याची संधी मिळाली, जी त्यांच्या चेस जर्नी मधील एक संस्मरणीय क्षण ठरली.

स्पर्धेचे वातावरण अत्यंत उत्साही आणि जागतिक स्वरूपाचे होते. जगभरातील बुद्धिबळ प्रेमींच्या गर्दीत आपल्या सिंधुदुर्गातील लहान खेळाडू असल्याचा अभिमान सर्वांना वाटत होता.

या ठिकाणी जिल्ह्यातील प्रमुख पंच भरत चौगुले सर आणि मनीष मारुलकर सर यांचे मार्गदर्शनही लाभले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेतील नियम, वातावरण आणि व्यावसायिक पातळीवर खेळाचे महत्त्व अधिक जवळून समजले.

या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी शिस्त, टीमस्पिरिट आणि खेळाविषयीची निष्ठा दाखवून दिली. त्यांनी बुद्धिबळाचा खरा अर्थ – “संयम, विचारशक्ती आणि आत्मविश्वास” – अनुभवला.

श्री चेस अकॅडमी, कणकवली ने नेहमीच जिल्हा आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पण या प्रवासाने त्यांच्या कर्तृत्वाला एक नवा आयाम दिला आहे. गोव्यातील हा प्रवास फक्त एक भेट नव्हता, तर तो होता स्वप्नांच्या दिशेने टाकलेला आत्मविश्वासपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल!

या अनुभवानंतर सर्व खेळाडू आता आणखी उत्साहाने, दृढनिश्चयाने व जिद्दीने सरावाला लागले आहेत.

त्यांच्या डोळ्यांत एकच स्वप्न –

“एक दिवस आपणही त्या पटावर भारताचे नाव उजळवायचे!”

श्री चेस अकॅडमी, कणकवलीचा हा गौरवशाली प्रवास सिंधुदुर्गातील सर्व बुद्धिबळ प्रेमींसाठी प्रेरणेचा दीप ठरला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा