विधानसभा अध्यक्षांची दखल; विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या कार्यपद्धतीचा “राज्य पॅटर्न” करण्याचा प्रस्ताव
सावंतवाडी
भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सुरू केलेल्या जनसंपर्क व सुविधा केंद्राच्या उपक्रमाची दखल खुद्द विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. परब यांच्या उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारची कार्यपद्धती राज्यातील सर्व आमदारांनी आपल्या मतदारसंघात राबवावी, अशा सूचना त्यांनी सहकारी आमदारांना दिल्या आहेत.
या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना मोफत दाखले, वैद्यकीय मदत तसेच रुग्णवाहिका सेवा पुरविण्यात येणार आहे. “तळागाळातील नागरिकांना शासनाच्या सेवा सुलभ व्हाव्यात, हा उद्देश या केंद्रामागे आहे,” असे परब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अत्याधुनिक पद्धतीने सुसज्ज असलेल्या या केंद्राचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांना आवश्यक सेवा मिळाव्यात, या हेतूने हे केंद्र कार्यरत राहणार असून, चार कर्मचारी कायमस्वरूपी येथे नियुक्त करण्यात येतील.
“सेवा केंद्र आणि जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लोकांशी थेट संपर्क साधता येईल. नियमितपणे कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ठराविक दिवस निश्चित करू,” असे परब यांनी सांगितले.
“जनतेची सेवा करणे हेच आमचे ध्येय असून सामाजिक कामातून गोरगरिबांपर्यंत पोहोचणे हा मुख्य उद्देश आहे. भविष्यात या सेवांचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे,” असे परब यांनी नमूद केले.
या प्रसंगी शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्यासह पक्षातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

