You are currently viewing मी नगराध्यक्ष केलं असं नाही; नारायण राणे, रवींद्र चव्हाण, सावंतवाडीकर जनता आणि पाटेकराच्या कृपेने नगराध्यक्षपदी बसलो:- संजू परब यांचे स्पष्टीकरण

मी नगराध्यक्ष केलं असं नाही; नारायण राणे, रवींद्र चव्हाण, सावंतवाडीकर जनता आणि पाटेकराच्या कृपेने नगराध्यक्षपदी बसलो:- संजू परब यांचे स्पष्टीकरण

*मी नगराध्यक्ष केलं असं नाही; नारायण राणे, रवींद्र चव्हाण, सावंतवाडीकर जनता आणि पाटेकराच्या कृपेने नगराध्यक्षपदी बसलो:- संजू परब यांचे स्पष्टीकरण*

सावंतवाडी

सावंतवाडी येथे विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नाम.नितेश राणे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत पार पडले.
शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपला दिलेल्या आव्हानावर, प्रतिक्रिया देताना नाम.नितेश राणे यांनी संजू परब यांचा नामोल्लेख टाळत “मी ज्यांना नगराध्यक्ष केलं ते मलाच आव्हान देतात. अरे ला का रे करण्यात आमची पीएचडी आहे. आत्ताच एका ३०७ च्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त झालो आहे” असे उत्तर देत प्रतिआव्हान दिले होते. सावंतवाडी ही संजू परब यांची कर्मभूमी असल्याने सावंतवाडीत येऊन आव्हान दिल्याने सकाळपासून पत्रकार, यावर संजू परब काय उत्तर देतात हे ऐकण्यास उत्सुक होते.
आम.केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांच्या आग्रहाखातर संजू परब पत्रकारांना सामोरे गेले. त्यांना पत्रकारांनी नितेश राणेंच्या वक्तव्याची जाणीव करून देत त्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा संजू परब म्हणाले, “खास.नारायण राणे हे माझे राजकीय गुरु आहेत, आम.रवींद्र चव्हाण आणि सावंतवाडीकर जनता, श्री देव पाटेकर देवता यांच्या कृपेने आणि मी अनेक वर्ष सावंतवाडी शहराचा रहिवासी असल्यानेच नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसलो. त्यामुळे मी नगराध्यक्ष केलं, असे काही नाही. परंतु “आत्ताच एका गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे, अरे ला कारे करण्यात आमची पीएचडी झाली आहे… असा गर्भित इशारा नाम.नितेश राणे यांनी दिला यावर संजू परब यांची प्रतिक्रिया विचारली असता मात्र मित्रपक्षाच्या आमदारांच्या टीकेवर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक भाजपा, शिवसेना (शिंदे), आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी एकत्र येत महायुतीच्या माध्यमातून लढली होती. यावेळी देवगड वैभववाडी मतदारसंघात भाजपाचे नाम.नितेशजी राणे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्याचवेळी तब्बल दोन टर्म आमदार असलेले कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांचा पराभव करत माजी खासदार निलेश राणे प्रथमच पुन्हा मालवण मतदार संघाचे आमदार झाले आणि सावंतवाडी मतदार संघाचा शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा एकदा अभेद्य राखत माजी मंत्री तथा आम.दीपक केसरकर हे चौथ्यांदा सावंतवाडी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यावेळी महायुती असल्याने तीनही पक्ष एक दिलाने एक मताने राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार येण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु राज्यपातळीवरील निवडणुका आणि स्वायत्त संस्थेच्या निवडणुका यामध्ये मोठा फरक असतो. केंद्राच्या, राज्याच्या निवडणुकांमध्ये आपला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधी पाठवायचा असतो तर, स्वायत्त संस्थांमध्ये आपल्या शहर, गावातील, आपल्या वॉर्डातील प्रतिनिधी ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद येथे पाठवायचा असतो. त्यामुळे स्वायत्त संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. बऱ्याचदा त्या ठिकाणी पक्षीय लेबल वापरले जाते असेही नसते. अशावेळी राज्य पातळीवरून युती किंवा आघाडी होईलच आणि होणे आवश्यकच आहे असेही गृहीत धरले जात नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये मित्र पक्षांनी एकमेकांना आव्हान देणे हे सुद्धा समाजातील, नागरिकांमधील सलोखा बिघडण्यासाठी कारणीभूत ठरते. अशावेळी एकाने “अरे” केलं तर दुसऱ्याने त्याला “कारे” न करता आपला उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल याकडे लक्ष दिले द्यावे म्हणजे नक्कीच यश पदरात पडते.
विधानसभेच्या निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात असलेली शिवसेनेची आणि पर्यायाने आम.दीपक केसरकर यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने केसरकरांची ताकद मोठी आहे हे आपण राजन तेली आणि विशाल परब यांच्यासारखे दोन तगडे उमेदवार समोर उभे असताना देखील केसरकरांनी मोठा विजय मिळविला यावरून दिसून येते. भाजपची ताकद नक्कीच केसरकर यांच्या मागे होती. परंतु आज ज्या विशाल परब यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उचलून धरले, प्रमोट केले तेच विशाल परब केसरकर यांच्या विरोधात उभे होते, गावागावातून माणसांना आमिष देऊन आणून मोठमोठ्या सभा घेतल्या, रॅली काढल्या होत्या. त्यामुळेच विशाल परब यांना 33051 मते मिळाली होती आणि राजन तेली (44662) व विशाल परब यांच्यासह अर्चना घारे (6019) यांच्या एकत्रित मतांची बेरीज देखील 79732 होत होती, जी केसरकरांचे 80389 मतांच्या मताधिक्यापेक्षाही कमी होती. त्यामुळे कोणीही कितीही टीका केली तरी आम.दिपक केसरकर यांचे वलय नक्कीच सावंतवाडी मतदारसंघात जादू करते आहे आणि शिवसेनेची ताकद देखील मतदारसंघात आहे हे अप्रत्यक्षपणे का होईना मान्यच करावे लागेल. त्याचबरोबर सावंतवाडी मतदारसंघात संजू परब यांची बऱ्यापैकी पकड आहे. त्यांना मानणारा एक युवा वर्ग आहे जो त्याच्या कार्यपद्धतीवर आकर्षित झालेला आहे. आपल्याकडे काहीही नसलं तरी जे आहे ते देण्याची त्यांची वृत्ती मोठा गोतावळा सोबत जमवून आहे. याच जोरावर संजू परब यांनी मांडलेली विजयाची गणिते सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन ठेवण्यात कारणीभूत आहेत. त्याकडे विरोधी पक्षाने आणि मित्रपक्षाने देखील कानाडोळा करून चालणार नाही हे मात्र नक्की..!

प्रतिक्रिया व्यक्त करा