*मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने श्री समर्थ साटम महाराज वाचन मंदिरच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*वस्त्रहरणकार स्व.गंगाराम गवाणकर यांना वाहिली श्रद्धांजली*
सावंतवाडी / दाणोली: नाट्य उताऱ्यांचे अभिवाचन केल्यामुळे नाटके पाहण्याची व नाटके वाचण्याची सवय लागू शकते, त्यामुळे वाचन संस्कृती वाढेल व मुलांना नाट्य उतारे व नाटके वाचण्याची सवय लागेल.. असे उद्दगार विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्य म. ल. देसाई यांनी काढले. पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून समर्थ साटम महाराज वाचन मंदिर दाणोली च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नाट्य उताऱ्यांचे अभिवाचन, दिवाळी अंकाचे प्रकाशन व वस्त्रहरणकार मालवणी नाटककार काही गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर वाचन मंदिराचे अध्यक्ष भरत गावडे , प्रमुख पाहुणे म .ल. देसाई, कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंतामणी मुंडले, सोमनाथ ठाकूर, उपाध्यक्ष भास्कर परब उपस्थित होते.
भरत गावडे यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून कै.गंगाराम गवाणकर यांच्या साहित्य प्रवासाबाबत सविस्तर माहिती सांगितली. मालवणी भाषेला साता समुद्रापलीकडे नेणारे वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांनी खऱ्या अर्थाने मालवणी भाषेला उत्तम दर्जा मिळवून दिला आहे. एका बोली भाषेमध्ये एवढे दर्जेदार नाटक लिहिण्याचे सामर्थ्य गंगाराम गवाणकर यांनी करून दाखवले हा आपला सर्वांचा गौरव आहे. म्हणूनच आपण आपल्या लोककला जोपासल्या पाहिजेत, दशावतार पाहिला पाहिजे ,व त्यांनाही प्रेरणा दिली पाहिजे. यावेळी नवोदित कवयित्री सौ.शमिका नाईक यांच्या सुरभी या काव्यसंग्रहावर भरत गावडे यांनी भाष्य करून ग्रंथालयाच्या वतीने शाल श्रीफळ व दिवाळी अंक भेट देऊन सौ.शमिका नाईक यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील वाचकांनी चांगले दर्जेदार दिवाळी अंक वाचावे म्हणून प्रतिवर्षी वाचनालयाच्या वतीने आठ ते दहा अंक घेतले जातात, त्यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आले. सोमनाथ ठाकूर यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व सांगितले आपल्या हातात जे पुस्तक मिळेल ते वाचावे, इतरांनाही वाचण्यास प्रवृत्त करावे, तरच वाचन संस्कृती वाढेल टिकेल. या वाचनालयामध्ये विविध उपक्रम राबविले जातात त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती केली. यावेळी शमिका नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंतामणी मुंडले यांनी बालवाचकांना मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक,नाटकाबद्दल आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला नामदेव राऊळ, विजय बांदेकर, गिरीधर चव्हाण, विलास जंगले, समीर नाईक, ग्रंथपाल दीपा सुकी व इतर कर्मचारी उपस्थित होते. शालेय मुलांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. १४ नोव्हेंबर बालदिनासाठी बालकांनी पुस्तके वाचावी त्याकरिता शिक्षक राजेंद्र देसाई यांनी ₹.५०००/- किंमतीची पुस्तके ग्रंथालयाला भेट दिली आहेत. श्री.दत्ताराम सडेकर यांनी तीन दिवाळी अंक दिले आहेत. यावेळी वाचक वर्ग कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदस्य रश्मी सावंत यांनी आभार मानले.

