वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त ७ नोव्हेंबरला मालवणमध्ये सामूहिक गायन…
मालवण
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक स्फूर्तिदायक गीत आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे ‘वंदे मातरम्’ या गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनेनिमित्त, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ७ नोव्हेंबर ला सकाळी ९ वाजता पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन व वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री ॲड. मंगल प्रभात लोंढा यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सार्ध शताब्दी महोत्सवात राज्यातील ३५८ तालुक्यांमधून ५ हजारहून अधिक देशप्रेमी सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यक्ष तहसीलदार वर्षा झालटे, प्रमुख वक्ता श्री शिवराज मंचचे अध्यक्ष भूषण साटम आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या सामूहिक गायन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
