महावितरणच्या उद्दाम कर्मचाऱ्याविरोधात ग्राहकाची कुडाळात लेखी तक्रार
– आक्रमक भाजपा पदाधिकाऱ्यांनीही कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना दिली “फायनल नोटीस”!
ग्राहकांना छळल्यास यापुढे जनहितार्थ प्रसंगी कायदा घेणार हातात!!
“‘लाईटचं बिल आत्ताच्या आत्ता आणि सगळंच्या सगळं भरलं पाहिजे, नाहीतर वीज खंडीत करणार” म्हणत ग्राहकांच्या घरी हुज्जत घालणाऱ्या महावितरणच्या उद्दाम कर्मचाऱ्याविरोधात कुडाळमध्ये अधिकृत तक्रार दाखल झाली आहे. हा प्रकार कळताच भाजपाचे राजेश पडते, आनंद शिरवलकर, अविनाश पराडकर, अविनाश पाटील आदी पदाधिकारी अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात पोहोचले. अधीक्षक अभियंता विनोद पाटील कार्यालयात उपस्थित नसल्याने अन्य अधिकारी त्यांच्या तावडीत सापडले. त्यांना चांगलेच धारेवर धरल्यानंतर ” आम्ही प्रत्येक ग्राहकाला सन्मान देऊ, कोणाचाही वीजपुरवठा खंडित करणार नाही, स्वखुशीने जी रक्कम भरणे शक्य असेल ती घेऊन उरलेल्या रकमेबाबत हप्त्यात भरण्याची सवलत देऊ” असे मान्य करण्यात आले. पण वसुलीसाठी उर्मट वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याला सक्त सूचना जोपर्यंत दिली जाणार नाही, तोवर कसलीच वसुली शहरात करू देणार नाही, प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी महावितरण जबाबदार राहील असे सांगत भाजपा पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांची भेट मागितली आहे. अधीक्षक अभियंता श्री विनोद पाटील हजर होताच कुडाळ शहरात वसुलीचे काम करणारे कर्मचारी आणि भाजपा शिष्टमंडळामध्ये याविषयी चर्चा होईल, त्यानंतरच वीजबिल वसुलीला बाहेर पडायचे, अन्यथा जनहितार्थ कोणत्याही गुन्ह्याला सामोरे जाण्यास आम्ही घाबरत नाही, अशी ठाम आग्रही भूमिका भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली.
कोरोना लॉकडाऊनमध्ये आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्राहकांना विजवितरणने झटका देत हजारो रुपयांची बिले काढली आहेत. त्यावर बिले सुधारुन देण्याची व्यवस्था असावी, ती सुलभ हप्त्यात भरण्यास मान्यता मिळावी आणि कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील एकही वीज कनेक्शन कापू नये अशी भाजपाची मागणी राहिली आहे. पण वसुलीचा छुपा अजेंडा असलेल्या महावितरणकडून अनेक ठिकाणी दादागिरी करुन, वीज कापण्याची धमकी देत जबरदस्तीची वसुली केली जात आहे. याला भाजपाचा विरोध असून तुम्ही सुधारला नाहीत, तर आम्ही बिघडू असा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर कुडाळच्या ग्राहकाला आलेल्या दहा हजार रुपयांच्या बिलापैकी तो पाच हजार रुपये भरायला तयार असतानाही, आताच्या आता सर्व बिल भर, अन्यथा वीजपुरवठा खंडित करू अशी धमकी देण्यात आली. या विषयावर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलतो असे ग्राहकांने सांगितल्यावर, “मी साहेब कोण ओळखत नाही, मी कोणाचा नोकर नाही, जे काय बोलायचं ते माझ्यासोबत” अशी उद्दाम उत्तरे त्याने दिली. कहर म्हणजे वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या फोनवरदेखील त्याने उद्धट उत्तरे दिली. अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना तातडीने सूचना द्या, अथवा बदली करा, अन्यथा कुडाळवासीयांचा संयम सुटला तर परिणाम चांगले होणार नाहीत, अशी स्पष्ट भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली. अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्यासमोर या सर्व कर्मचाऱ्यांची बैठक भाजपा शिष्टमंडळासोबत तातडीने लावावी, अन्यथा जनतेच्या हितासाठी प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी पाठी हटणार नाही, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. एकूणच जबरदस्तीने बिलेवसुलीचा प्रश्न या निमित्ताने पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.