You are currently viewing राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकांची घोषणा; आचारसंहिता लागू

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकांची घोषणा; आचारसंहिता लागू

२ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी; २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार

 

मुंबई :

राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायती (एकूण २८८ स्थानिक स्वराज्य संस्था) यांच्या थेट अध्यक्षपदासह सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुका २ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून मतमोजणी ३ डिसेंबरला पार पडेल. त्यामुळे आजपासून संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिली.

सचिवालयातील समिती सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. वाघमारे बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपस्थित होते.

श्री. वाघमारे यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची सुरुवात १० नोव्हेंबर २०२५ पासून होईल.

नामनिर्देशनाची अंतिम तारीख: १७ नोव्हेंबर

छाननी: १८ नोव्हेंबर

नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख: अपील नसल्यास २१ नोव्हेंबर, तर अपील असल्यास २५ नोव्हेंबर.

मतदान: २ डिसेंबर, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत

मतमोजणी: ३ डिसेंबर, सकाळी १० वाजल्यापासून

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील एकूण २४७ नगरपरिषदांपैकी २४६ नगरपरिषदांच्या निवडणुका यावेळी होणार आहेत. यापैकी १० नव्याने स्थापन झालेल्या आहेत, तर उर्वरित २३६ परिषदांचा कार्यकाळ संपलेला आहे. न्यायालयीन कारणास्तव अकोल्यातील पातूर नगरपरिषदेची निवडणूक सध्या प्रलंबित आहे.

दरम्यान, राज्यातील १४७ नगरपंचायतींपैकी ४२ नगरपंचायतींसाठीही निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापैकी १५ नव्याने स्थापन झालेल्या असून २७ नगरपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे. उर्वरित १०५ नगरपंचायतींचा कार्यकाळ अद्याप सुरू आहे.

निवडणूक तयारीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आल्याचेही आयुक्त वाघमारे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा