वर्धापन दिनानिमित्त पणजीत साहित्य संमेलनाचे आयोजन
पणजी :
लेखकांनी भरपूर वाचन केले पाहिजे. कथा, कविता तपशिलात लिहिल्या पाहिजेत. परिश्रम करण्याची तयारी पाहिजे. कठीण विषय सुलभ भाषेत मांडले पाहिजत. गोव्यातील मत्स्योद्योग, गोमंतकीय कुळागरे, सामाजिक बदल अशा विविध विषयावर लेखन झाले पाहिजे. नवनवीन वाचकांना आकर्षित केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी साहित्यिक गजानन देसाई यांनी केले.
बृहन्महाराष्ट्र मंडळ दिल्ली या संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त ताळगाव येथील साहित्यलेणी प्रतिष्ठानने संस्कृती भवनात एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ मराठी साहित्यिक गजानन यशवंत देसाई संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कामगार नेते अजित सिंह राणे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ मराठी साहित्यिक डॉ. बसवेश्वर चेणगे विशेष अतिथी व ज्येष्ठ मराठी साहित्यिक रजनी अरुण रायकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. डॉ. गुरुदास भालचंद्र नाटेकर संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.
कामगारांनी हक्कासाठी लढले पाहिजे. पण कामही केले पाहिजे. मराठी चळवळ सुरू राहिली पाहिजे. मराठीला गोव्यात प्राचीन परंपरा आहे. तिचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. असे ते म्हणाले. साहित्य लेणी प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले. प्रारंभी प्रतीकात्मक दिंडी काढण्यात आली. दिंडीचे उद्घाटन अपूर्वा ग्रामोपाध्ये यांनी केले.
डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी साहित्यलेणीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी गुंफण अकादमीची माहिती दिली. चित्रा क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. शर्मिला प्रभू यांनी सूत्रसंचालन केले. बबिता गावस, बबिता नार्वेकर, माधुरी उसगावकर यांनी सहकार्य केले.
