You are currently viewing कणकवलीत भाजप उमेदवारीसाठी इच्छुकांची लगबग

कणकवलीत भाजप उमेदवारीसाठी इच्छुकांची लगबग

कणकवलीत भाजप उमेदवारीसाठी इच्छुकांची लगबग

निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी – समीर नलावडे

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारांच्या इच्छुकतेला वेग आला आहे. शहरातील १७ प्रभागांपैकी अनेक ठिकाणी एका जागेसाठी दोन ते तीन इच्छुक पुढे येत असल्याने पक्षातील निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आली.

ही बैठक माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, तसेच पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर बोलताना श्री. नलावडे म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून कणकवली नगरपंचायतीत खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. कार्यकर्त्यांनी सातत्याने पक्षाशी निष्ठा ठेवत काम केले आहे. या प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या निष्ठेच्या बळावरच पक्ष अधिक मजबूत व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

शहरातील प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांची जनतेशी घट्ट नाळ असल्याने अनेक उमेदवार इच्छुक आहेत. या सर्व इच्छुक कार्यकर्त्यांची नावे खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहेत.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे हे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यादरम्यान भाजप पदाधिकारी त्यांची भेट घेऊन इच्छुक कार्यकर्त्यांच्या नावांची यादी सादर करणार आहेत.

श्री. नलावडे यांनी सांगितले की, “राणे परिवाराच्या नेतृत्वाखाली भाजप कणकवलीत मजबूतपणे उभा आहे. मात्र पक्षाशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये, हीच आमची अपेक्षा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा