You are currently viewing चक्रिवादळ शांत; सिंधुदुर्गात सागरी पर्यटन आणि मासेमारी पुन्हा सुरू

चक्रिवादळ शांत; सिंधुदुर्गात सागरी पर्यटन आणि मासेमारी पुन्हा सुरू

दहा दिवसांच्या बंदीनंतर किनारपट्टीवर पर्यटन, होडी वाहतूक आणि वॉटर स्पोर्ट्सला पुन्हा गती

मालवण :

अरबी समुद्रातील चक्रिवादळामुळे गेल्या दहा दिवसांपासून किनारपट्टीवरील मासेमारी आणि सागरी पर्यटन पूर्णपणे ठप्प झाले होते. मात्र आता समुद्रातील वादळ पूर्णपणे शांत झाले असून हवामान पूर्ववत झाले आहे. यामुळे बंदर विभागाकडून किनारपट्टीवर लावण्यात आलेला धोक्याचा तीन नंबर बबटा उतरवण्यात आला आहे. किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी सेवा आणि सागरी पर्यटन आजपासून पुन्हा एकदा सुरू झाले आहे, अशी माहिती बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी दिली.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर सध्या हवामान अनुकूल आहे. त्यामुळे गेले दहा दिवस बंद असलेली सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक, वॉटर स्पोर्ट्स आणि पॅरासिलिंग यांसारख्या पर्यटन सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.

दरवर्षी १ सप्टेंबरपासून सागरी पर्यटन हंगामाची सुरुवात होते. दिवाळी सुट्ट्यांचा कालावधी हा हंगामाचा प्रमुख काळ मानला जातो. मात्र वादळाच्या परिस्थितीमुळे यंदाचा संपूर्ण दिवाळी हंगाम सागरी पर्यटनासाठी ठप्प झाला. याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. वॉटर स्पोर्ट्स, पॅरासिलिंग, स्कुबा डायव्हिंग आणि किल्ला होडी वाहतुकीसोबतच हॉटेल व्यवसाय क्षेत्रालाही अनेक बुकिंग रद्द झाल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले.

पर्यटकांची रेलचेल थांबल्याने मालवणच्या पर्यटन क्षेत्रासोबतच येथील अर्थकारणालाही मोठा आर्थिक फटका बसला. आता वातावरण निवळल्यामुळे पुन्हा एकदा पर्यटनाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा