You are currently viewing ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम गोसावी यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम गोसावी यांचे निधन

मालवण :

मसुरे मेढा वाडी गावचे सुपुत्र ,अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम उर्फ बाळा नारायण गोसावी (वय वर्षे ६०) यांचे रविवारी रात्री उशिरा मालवण येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानेआकस्मित निधन झाले. सोमवारी सकाळी मुंबई मिरा रोड येथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी म्हणून ते काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. बाळा गोसावी यांच्या निधनाने मसुरे गावावरती शोककळा पसरली आहे.शांताराम गोसावी हे बाळा या टोपण नावाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. मसुरे गावच्या सामाजिक, कला ,क्रीडा, धार्मिक पर्यटन ,उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचे बहुमूल्य असे योगदान होते. कैलासवासी नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध क्रीडा स्पर्धा , विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेणे, अनेक गोरगरीब रुग्णांना सहकार्य करणे, वृद्धांना खावटी स्वरूपात मानधन त्यांनी दिले होते. अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष ,महाराष्ट्र कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष, तसेच भटक्या विमुक्त जाती -जमाती भारतीय जनता पार्टी सेलचे ते राज्य उपाध्यक्ष होते. विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले होते. मसुरे गावातील अनेक तरुणांना त्यांनी मुंबईमध्ये रोजगाराची संधी निर्माण करून दिली होती. दरवर्षी 500 गरीब विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक मदत करत होते. साई पुण्यतिथी उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी मसुरे गावामध्ये अनेक समाजाभिमुख उपक्रम दरवर्षी राबविले होते. सिंधुदुर्गामध्ये राज्य, आंतरराज्य विविध कॅरम स्पर्धा पुरस्कृत करून सिंधुदुर्गातील क्रीडा प्रेमींना आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. प्रतिवर्षी मोफत आरोग्य शिबिरे भरवून सिंधुदुर्गासहित महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांना हक्काचा आधार मिळवून दिला होता. मुंबई महानगरपालिकेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावरती त्यांना अनेक राज्य ,आंतरराज्य पुरस्कार मिळाले होते. गोरगरिबांचे पाठीराखे म्हणून त्यांची संपूर्ण मसुरे गावामध्ये ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी ,बहिणी असा मोठा परिवार असून भारतीय कॅरम ज्युनियर संघाचा माजी कर्णधार नॅशनल कॅरमपटू श्री वरुण गोसावी आणि मिरा रोड येथील डॉक्टर नेहा गोसावी यांचे ते वडील होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा