संपादकीय….
*लाखे वस्तीतील लोक कोणासोबत…???*
प्रश्न एक उत्तरे किती…?
निवडणुका आल्या की पावसाळ्यात अळंबी येत नाहीत एवढे पक्षप्रवेश इकडून तिकडे होताना दिसतात. सकाळी कमळ घेऊन फिरणारा माणूस सायंकाळी त्याच्यावर धनुष्यबाण सोडतो आणि देठ मोडून टाकतो. पुन्हा एकदा काळोखात धडपडत तुटलेला देठ सांधत दोन्ही बाजू सावरण्याचाही प्रयत्न होतो.
पण…,
अशा पक्षप्रवेशावर विश्वास कोणी ठेवायचा..?
एका घरातील पाच माणसे एका मतावर ठाम नाहीत तिथे दोन अडीचशे मते एका माणसावर, एका पक्षावर निष्ठा ठेवतील का..?
नक्कीच नाही..!
परंतु..,
कोणीही कितीही सांगितले तरी लाखे वस्तीतील जुनी माणसे मात्र दीपक केसरकर यांनी काही वर्षांपूर्वी झोपडीत राहणाऱ्या लाखे वस्तीतील भटक्या समाजासाठी स्लॅब असलेली पक्की घरे उभी करून दिलीत हे विसरणार नाहीत. एकीकडे भंगार, रद्दी, प्लास्टिक, बाटल्या गोळा करून त्यावर उदरनिर्वाह करणारा हा समाज आज सुधारला, सुशिक्षित झाला. मुले शिकली, नोकरी करू लागली. त्यामुळे समाजात वावरताना विविध पक्ष संघटनांकडे आकर्षित झालीत. मतांसाठी मिळणारे पैसे कोणाला नको आहेत..? अलीकडे सुशिक्षित, सुसंस्कृत लोक सुद्धा पैसे घेऊन मतदान करतात तिथे हा उपेक्षित असलेला समाज का नाही घेणार..? परंतु अशी समाजाची कमजोरी ओळखून पैशाने सत्ता मिळवणारे मात्र आलेली संधी साधून घेतात आणि या गरीब समाजातील लोकांकडून आपला फायदा करून घेतात.
अशा सर्व घडामोडींमध्ये अशीही माणसे असतात जी आपली इमानदारी समोरासमोर बोलून दाखवतात. अशीच एक लाखे वस्तीतील वयस्कर महिला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेली आणि “आपला व आपल्या समाजाचा पाठिंबा नेहमीच तुमच्या सोबत आहे. आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत. आमच्या लोकांना फसवून नेलं त्यांनी, आणि जे काहीजण पैसे घेतात ते असतील इतरांसोबत पण आम्ही तुमच्यासोबतच राहू. तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही त्यामुळे भले पण तुमचंच होणार. काही काळजी करू नका, तब्बेतीची काळजी घ्या”. असे सांगत दोन्ही हातांनी आशीर्वाद देते. अशावेळी पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो…
ते लोक जे भाजपच्या लोकांसोबत त्यावेळी गेले ते मनापासून गेले होते की कोणाच्या भूलथापांना भुलले आणि गेले..? आज कुठलाही समाज एवढा मागास राहिला नाही की या गोष्टी त्यांना समजत नाहीत. परंतु पुन्हा एकदा हाच समाज एकवटून शिंदे शिवसेनेकडे जातो आणि आम्हाला फसवून नेलं अशी बतावणी करतो. तेव्हा मात्र समाजात एकी नसून काहीजण मिळालेल्या संधीचा फायदा उठवतात, काहीजण येणाऱ्या संधीची वाट पाहतात तर काहीजण त्यांच्यावर असलेल्या दबावापोटी जो बोलवेल त्याच्या सोबत जातात अशीही परिस्थिती दिसून येते. भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी पक्ष प्रवेश करुन घेऊन काही तास उलटताच त्यातील अनेकजण संजू परब यांच्या कार्यालयासमोर एकत्र जमून आम्ही केसरकर यांच्यासोबत आहोत, आम्हाला कार्यालयाचे उद्घाटन आहे असे सांगून फसवून नेलं असही बोलतात. परंतु या मागे नक्की गौडबंगाल काय…? ही माणसे फसवून नेली गेली की कुणीतरी काहीतरी आमिष दाखवून नेली..?
कशीही नेली, गेली तरी आजच्या घडीला दोन्ही पक्षांकडे गेल्याने लाखे वस्तीतील माणसे नक्की कोणाकडे..? हाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
या समाजातील दोन्ही गटांच्या बोलण्याकडे बारकाईने पाहिले असता काही लोक केसरकरांनी निवासस्थानाच्या उर्वरित जागेचा प्रश्न न सोडविल्याने त्यांच्या घरांचा प्रश्न उभा राहिल्याचे दिसून येते. परंतु उर्वरित बहुतांश लोकांना राहण्यासाठी उत्तम घरे असल्याने ते लोक शिंदे शिवसेना म्हणजेच केसरकर यांच्या पाठीशी असल्याचे चित्र दिसते आहे. सद्य स्थितीत सत्तेत असणारेच दोन्ही पक्ष आपापले वजन वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याने त्यांच्यासमोर त्यांचेच आव्हान उभे राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी एकमेकांची स्तुती करणारे, नेत्यांकडून चिरीमिरी घेऊन प्रचारात मुसंडी मारणारे आज त्याच नेत्याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. किंबहुना पक्षीय बलाबल वाढविण्यासाठी कधी मैत्रीची तर कधी आव्हानांची भाषा करीत आहेत. त्यामुळे असंघटित असलेल्या भटक्या समाज बांधवांना आशेची किरणे दाखवून भुलवित आहेत.
परंतु…,
कितीही झालं तरी उपकाराची जाण असणारी या वृद्ध बाईसारखी माणसे मात्र केसरकर यांनाच दैवत मानून त्यांच्या पाठीशी ठाम उभी आहेत. लोकांचं हे प्रेम, हा विश्वासच केसरकरांना निवडणुकीत पारडे आपल्या बाजूने झुकविण्यासाठी कामी येत आहे हे मात्र नक्कीच आणि ते गेल्या कित्येक निवडणुकीत वेळोवेळी दिसून आले आहे.
