वाकड, चिंचवड –
वेदना जागवते संवेदना. त्या संवेदनेतून जेव्हा कृतिशील कार्य घडते तेव्हा नावलौकिक वाढतो. समाजहिताचे भरीव कार्य पोस्टल कॉलनी वाकडच्या आनंद जेष्ठ नागरिक संघाने केलेय.
“माणुसकीचा झरा,हाच आहे संघाचा इरादा!” या उक्तीला सार्थ करणारे महनीय कार्य आनंद ज्येष्ठ नागरिक संघ पोस्टल कॉलनी वाकडचे आहे.
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला आपण काहीतरी देणे लागतो,म्हणून संघाने फुल नाही तर फुलाची पाकळी स्वरूपात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील, सीना नदीच्या काठी वसलेल्या, परंतु आता महापुराने वाताहत झालेल्या, घाटणे गावातील 110 उध्वस्त उंबरठ्याना दिवाळी आनंदात जावी म्हणून आनंद जेष्ठ नागरिक मदतीचा हात दिला.
संघाने दिवाळी निमित्त नुकतेच 5 किलो गहू, दोन किलो तांदूळ, एक किलो साखर, एक लिटर गोड तेल, अर्धा किलो तूर डाळ, अर्धा किलो मूग डाळ, पावशेर चहा पावडर, दोन बिस्कीट पुडे, मिठाईचा बॉक्स, वासाचे तेल, उटणे, अंगाचा साबण, आकाश कंदील, ब्लॅंकेट व रुपये 1500/ चे पाकीट असे एकूण 75 किट तयार करून प्रत्यक्ष पुरग्रस्तांच्या घरी जाऊन त्याचे वाटप केले.
या सर्वांगसुंदर मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाल्याने संघाच्या कष्टाचे सार्थक झाले.
संघाने त्यासाठी पूरग्रस्तनिधी संकलन समिती स्थापन केली. समितीचे कामकाज मुरलीधर लहाने यांच्या अध्यक्षतेखाली सुरेश बोरकर, माधव बराटे, अशोक बोंडे, अप्पासाहेब तेली, श्रीकांत रेवणवार, रामचंद्र कळमकर, सुभाष वाणी, प्रवीण कुलकर्णी, सुभाष चौधरी, सुधाकर जगताप, आसावरी लहाने, अलका कळमकर, संगीता साठे, प्रतिभा गवळी, विभा दरेकर या सभासदांच्या साथीने पार पडले.
आनंद जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागवत कोल्हे यांच्या उत्तम मार्गदर्शनाने तसेच घाटणे गावातील श्री ऋतुराज देशमुख (सरपंच) श्री मुकुंद देशमुख (पोस्ट मास्तर), श्री रवींद्र जाधव (आरोग्य खाते), रुपाली पाटणे (आशा वर्कर) यांचे सहकार्य आनंद ज्येष्ठ नागरिक संघास मिळाले.
आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख अशोक बोंडे, सौ हेमांगी बोंडे यांनी वरील सविस्तर माहिती पत्रकार बाबू डिसोजा यांना दिली.
