मृत व्हेल माशांच्या सांगाड्यांचे पर्यटन व अभ्यास केंद्रात रूपांतर करावे — बाबा मोंडकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
मालवण,
मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर अलीकडेच दोन प्रचंड व्हेल मासे मृत अवस्थेत वाहत आले असून, या दुर्मीळ घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी या मृत व्हेल माशांच्या सांगाड्यांचे संवर्धन करून त्यांचे पर्यटन आणि अभ्यास केंद्रात रूपांतर करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मोंडकर यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे मालवणला भेट देणाऱ्या लाखो पर्यटकांना समुद्री जैवविविधता आणि समुद्र विज्ञानाविषयी माहिती देणारे एक अनोखे आकर्षण केंद्र निर्माण होईल. तसेच संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठीही हे एक महत्त्वाचे अभ्यास केंद्र ठरेल.
सध्या मृत व्हेल माशांपैकी एकाचा सांगाडा सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील खडकांमध्ये स्थिरावला आहे, तर दुसरा मासा वायंगणी समुद्रकिनारी जेसीबीच्या साहाय्याने पुरण्यात आला आहे. शासनाने या सांगाड्यांचा ताबा घेऊन आवश्यक ती केमिकल प्रक्रिया करून त्यांचे संवर्धन करावे आणि म्युझिअममध्ये रूपांतर करण्याची मागणी मोंडकर यांनी केली आहे.
दरम्यान, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून तारकर्ली समुद्रकिनारी ३ कोटी रुपयांचा प्रादेशिक पर्यटन विकास निधी मंजूर झाला आहे. या निधीतून ६० गुंठे सरकारी पडजमिनीवर पर्यटन सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्या जागेच्या संपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात अंतिम टप्प्यात आहे. याच ठिकाणी व्हेल माशांच्या सांगाड्यांचे हे म्युझिअम उभारणे शक्य होईल, अशी माहिती मोंडकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरवर्षी सुमारे दहा लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. त्यामुळे या म्युझिअमची उभारणी झाल्यास जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी एक नवे आकर्षण केंद्र निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संदर्भात मत्स्यव्यवसाय खाते आणि कांदळवन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने सांगाड्यांचे जतन आणि संवर्धन तातडीने करण्याचे आदेश देण्याची मागणीही मोंडकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
