*वस्त्रहरणकार स्व.गंगाराम गवाणकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा कोमसापने वाहिली श्रद्धांजली*
कुडाळ :
मालवणी बोलीभाषेसाठी जे जे विधायक कार्य आहे ते हाती घेऊन गवाणकर यांच्या प्रतिमेला अधिकाधिक उजाळा देण्यासाठी प्रयत्न करूया. नाटकाच्या माध्यमातून साता समुद्रापार मालवणी बोली भाषेला पोहोचविणारे स्वर्गीय थोर लेखक आणि नाटककार गंगाराम गवाणकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मालवणी बोलीभाषेला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करूया असे उद्गार कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्ष मंगेश मसके यांनी कुडाळ येथे काढले.
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित ‘वस्त्रहरणकार’ गंगाराम गवाणकर यांच्या शोकसभेनिमित्त श्री. मसके बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी अनंत वैद्य, संत राऊळ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. दिपाली काजरेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर, लेखिका स्नेहल फणसळकर, ॲड. नकुल पार्सेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रा.संतोष वालावलकर, सचिव सुरेश पवार यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सर्वांनी नाट्य लेखक गंगाराम गवाणकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर उपस्थित कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी यांच्या वतीने भावपूर्ण शब्दसुमनांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर यांनी विशेष मालवणी बोलीभाषेतून आपल्या भावना व्यक्त करत गवाणकर यांना श्रद्धांजली व्यक्त केली. कवी पटेकर म्हणाले, आपण मुंबईत नोकरीनिमित्त असताना जास्तीत जास्त मालवणी भाषेलाच प्राधान्य देत बोलत होतो. ज्यामुळे आपोआपच मालवणी भाषेचा प्रचार आणि प्रसार होत होता. गंगाराम गवाणकरांच्या सानिध्यात उशिरा आलो तरी प्रामाणिकपणे मालवणी भाषेचा प्रचार करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
लेखिका स्नेहल फणसळकर यांनी देखील माझ्या पुस्तकाला आशीर्वादरुपी शुभेच्छा थोर नाटककार गवाणकरांच्या मिळाल्याबद्दल आपण भाग्यवान असल्याचे नमूद करत स्वर्गीय गवाणकर यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.
कुडाळ तालुकाध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांनी ‘वस्त्रहरणकार’ गंगाराम गवाणकरांच्या स्मृति जागृत करून नाट्य क्षेत्रातील त्यांचे योगदान अधोरेखित केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले व सध्या कुडाळ येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असलेले अनिल पोवार यांनी शालेय जीवनातील वस्त्रहरण नाटक आणि गवाणकर यांच्याबद्दल आपले स्वानुभव व्यक्त केले, तसेच जिल्हा सहसचिव सुरेश पवार, संदीप साळसकर, प्रा. सुभाष गोवेकर व भरत गावडे, डॉ. दिपाली काजरेकर यांनीही आपापल्या भावना व्यक्त केल्या.
ॲड. नकुल पार्सेकर यांनी देखील मालवणी भाषेत स्वर्गीय गवाणकर यांच्यावर स्वरचित काव्य सादर करून तसेच गवाणकर यांच्याबद्दल आपल्या जीवनातील आठवणीतील काही निवडक प्रसंग कथन केले.
ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत आगामी काळात जास्तीत जास्त मालवणी भाषेला आणि गवाणकरांच्या स्मृतींना कसे जपले जाईल? याबाबत मार्गदर्शन करून श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ लेखक व कवी अनंत वैद्य यांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रमात मालवणी बोलीभाषेला तसेच मालवणी भाषेतील साहित्य व साहित्यिकांना कसे स्थान मिळेल?, याबाबत आपले विचार व्यक्त करून गवाणकर यांना आदरांजली वाहिली.
संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.स्मिता सुरवसे यांनी देखील ”जरी आपल्याला नाट्य लेखक गवाणकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला नसला तरी मात्र त्यांचे ‘वस्त्रहरण’ आणि ‘वन रूम किचन’ या नाटकांतून प्रत्यक्षरीत्या त्यांच्या प्रतिभेचा परिचय झाला असल्याचे नमूद करत स्वर्गीय गवाणकर यांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर जे जे सहकार्य लागेल ते केले जाईल, असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रुपेश पाटील यांनी केले.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, ज्येष्ठ लेखक व कवी अनंत वैद्य, सुरेश पवार, दीपक पटेकर, भरत गावडे, प्रा. सुभाष गोवेकर, स्वाती सावंत, डॉ.दिपाली काजरेकर, डॉ. स्मिता सुरवसे, सौ. वृंदा कांबळी, डॉ.रवींद्र ठाकूर, ॲड. नकुल पार्सेकर, ॲड. दीपक म्हाडदळकर, अंकुश कुंभार, स्नेहा फणसळकर, गोविंद पवार, निलेश जाधव, दत्तप्रसाद राऊळ, प्रा. संतोष वालावलकर, अक्षय धुरी, संदीप साळसकर, कृष्णा मसके, बुधाजी कांबळे, राजेंद्र गोसावी, संगम कदम, वसंत तेली, अनिल पोवार, योगेश फणसळकर, जितेंद्र केळुसकर यांसह कोकण मराठी साहित्य परिषद परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
