सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसची जोरदार तयारी; सर्व उमेदवार रिंगणात उतरवण्याचे आवाहन — ॲड. दिलीप नार्वेकर
सावंतवाडी :
येत्या नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी करावी, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे नेते व माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर यांनी केले. त्यांनी स्पष्ट केले की, पक्षाकडे मागणी अर्जाद्वारे उमेदवारी द्यावी आणि वरिष्ठ नेत्यांचा जो काही निर्णय असेल, तो सर्व कार्यकर्त्यांनी मान्य करावा.
सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष बासिप पडवेकर, जास्मिन लक्षमेश्वर, उपाध्यक्ष शिवा गावडे, सरचिटणीस रुपेश अहिर, संजय राऊळ, तसेच ओबीसी शहर अध्यक्ष संतोष मडगावकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर म्हणाले, “महाविकास आघाडी संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. तालुका काँग्रेस आघाडी टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, जर आघाडी झाली नाही, तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत.”
त्यांनी पुढे सांगितले की, शहरातील प्रत्येक वॉर्डनिहाय बैठकीचे आयोजन करण्यात येईल. त्या बैठकीत इच्छुक उमेदवारांचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठीचे अर्ज शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर यांच्याकडे स्वीकारले जातील. हे अर्ज पुढील १० दिवसांत जिल्हा काँग्रेस कमिटी व प्रदेश काँग्रेस कमिटीला निरीक्षकांच्या माध्यमातून पाठवले जाणार आहेत.
बैठकीत हेही स्पष्ट करण्यात आले की, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल.
या बैठकीला सुमेधा सावंत, माया चिटणीस, स्मिता टिळवे, ज्ञानेश्वर पारधी, बाळा नमशी, प्रतीक्षा भिसे, अरुण भिसे, विल्यम सालदाना, लक्ष्मण भुते, श्याम सावंत, किशोर राणे, रफिक नाईक, मिनिन गोम्स, शरद गावडे, दीपक कदम, सत्यवान शेडगे, मिलिंद सुकी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीचे आभार अरुण भिसे यांनी मानले.
