आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश
पर्यटन सुविधा उभारणीसह सेल्फी पॉईंट, गणेेश घाट, बैठक व्यवस्था आणि उद्यान विकास होणार..
कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील डिगस-चोरगेवाडी येथील तलाव परिसर सुशोभीकरणासाठी अडीज कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी निखिल कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाल्याबद्दल श्री. कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजनेतून डिगस-चोरगेवाडी तलाव येथे सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी निखिल कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आमदार राणे यांनी शिफारस करून तलाव परिसरात उद्यान विकसित करणे, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा केंद्रांचे बांधकाम, गणेश विसर्जनासाठी सुसज्ज गणेश घाट, जेटी बांधकाम, बैठक व्यवस्था आणि आकर्षक सेल्फी पॉईंट उभारणे या कामांसाठी एकूण २ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
डिगस-चोरगेवाडी तलाव हा मुंबई-गोवा महामार्गाजवळ असून गेल्या दोन वर्षांपासून येथे वॉटर स्पोर्ट्स सुरू आहेत. या उपक्रमाला पर्यटकांची चांगली पसंती मिळत आहे. तलाव परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित झाल्यास डिगस गावातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
यासाठी निखिल कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन निधी मिळविण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून आज प्रादेशिक पर्यटन योजनेतून अडीज कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती देण्यात आली.
