देशातील पहिले ‘AI-सक्षम प्रशासन’ बनलेल्या सिंधुदुर्गकडे आता राष्ट्रीय स्तरावर लक्ष
“सिंधुदुर्ग ठरणार देशासाठी आदर्श मॉडेल” – पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी :
देशभरात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केला असून, या मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडित नीती आयोगाची विशेष टीम दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिंधुदुर्गमध्ये दाखल झाली आहे.या टीमकडून जिल्ह्यातील सर्व विभागांनी AI प्रणाली कशी स्वीकारली आहे, प्रशासनातील कार्यपद्धतीत काय बदल घडले, तसेच प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यात AI कशा प्रकारे वापरले याचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे. या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास प्रवासाला राष्ट्रीय पातळीवर नवा आयाम मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केले.
नीती आयोगाच्या या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान कार्यालयाशी निगडित असलेल्या या आयोगाने सिंधुदुर्गच्या AI मॉडेलचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला, याचा अर्थ देशभरात या जिल्ह्याच्या कार्यपद्धतीकडे एक “नवीन दृष्टिकोन” म्हणून पाहिले जात आहे. सिंधुदुर्ग हा केवळ पर्यटन जिल्हा नसून एक साक्षर आणि प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. AI प्रणालीच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, जलद आणि उत्तरदायी बनत आहे. जिल्ह्याच्या प्रतिमेवर या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम होत असून, इतर जिल्ह्यांसाठी हे मॉडेल प्रेरणादायी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहा जिल्हे AI मॉडेलवर विकसित करण्याची संकल्पना मांडली होती. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या कामाची दखल घेऊन नीती आयोगाने येथे अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मार्व्हल कंपनीच्या सहकार्याने जिल्ह्यातील AI उपक्रम राष्ट्रीय स्तरावर मान्यता पावत आहे असेही ते म्हणाले.
जिल्ह्याच्या विकास प्रवासाबद्दल बोलताना पालकमंत्री श्री राणे म्हणाले की, ‘आज सिंधुदुर्गमध्ये जे काम सुरू आहे तेच उद्या देशातील इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरणार आहे. भविष्यात जेव्हा इतर जिल्हे अशा प्रकारच्या प्रणाली स्वीकारतील, तेव्हा ‘AI मॉडेलचा मूळ जिल्हा’ म्हणून सिंधुदुर्गचे नाव अग्रस्थानी राहील. हे आपल्यासाठी नक्कीच भुषणावह राहणार आहे असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम उपस्थित होते.
