वायंगणी-कांबळीवाडी समुद्रकिनारी भला मोठा व्हेल मासा मृतावस्थेत
वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी-कांबळीवाडी समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी सुमारे ३० ते ४० फूट लांबीचा भला मोठा व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. हा मासा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असून त्याचा मोठा भाग समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे नष्ट झाला आहे.
सध्या सुरू असलेल्या वादळामुळे हा व्हेल मासा समुद्राच्या लाटांबरोबर वाहत येत किनाऱ्यावर आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी समुद्रात मृत झालेला हा मासा प्रवाहाबरोबर पुढे सरकत अखेर वायंगणी-कांबळीवाडी किनाऱ्याला लागला आहे.
या घटनेची माहिती कासवमित्र सुहास तोरस्कर यांनी संबंधित कांदळवन विभाग आणि वनविभागाला दिली आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला असून पुढील आवश्यक सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.
दरम्यान, कालच कोंडुरा समुद्रकिनाऱ्यावरही अशाच प्रकारचा एक व्हेल मासा आढळून आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
— संवाद प्रतिनिधी, वेंगुर्ले

