*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दिवाळीची ओवाळणी…*
दिवाळीची ओवाळणी, घाला गरीबाला घाला
पंचपक्वानांचा स्वाद जरा चाखू द्या हो त्याला…
घरोघर दिवाळी ती आजकाल रोज रोज
नाही अंगभर वस्त्र राबणाऱ्या शेतकऱ्याला…
घरी नोकरचाकर त्यांना द्या ना हो दिवाळी
राबतात आपल्यासाठी रोज सांजनिसकाळी
घरी ठेवून लेकरे देती आपल्याला सुख
आपणच जाणावे हो त्यांचे सुख आणि दु:ख…
ऋण देशाचे फेडावे करा समाजाची सेवा
भरा सत्कर्माचे घडे लोक करतील हेवा
नको जावयास दूर आजूबाजूलाच बघा
दिल्याघेतल्याने वाढे आपल्या कर्तव्याची प्रभा…
एक हात देण्यासाठी सदा ठेवावा हो वर
नाही होत रिकामे हो मन आपुले नि घर
येत राहते हो प्रेम नाही पडत हो कमी
पहा प्रयोग करून मीच देते तुम्हा हमी…
भावा बरोबर एक कुणी गरीब बोलवा
कपडेलत्ते गरजूला द्या हो पुरी नि हलवा
त्याच्या डोळ्यातील पाणी सांगेल हो त्याची व्यथा
दिवाळीची ओवाळणी यश देईल हो हाता..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
